
पालखी-तरंग व लवाजम्यासह भाविकांच्या उपस्थितीत मालवणात देवतांची महोदया पर्वणी (समुद्री स्नान) मंगळवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. ढोलताशांचा गजर व सनईच्या सुराने मालवण नगरी गजबजून गेली. देवतांनी स्नान केल्यानंतर त्या ठिकाणी भाविकांनीही समुद्रस्नान केले. भक्तिभावाचा हा संगम सोहळा स्मरणीय ठरला.
मालवणची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर-नारायण यासह मालवणात दाखल झालेल्या अनेक देवतांच्या व भाविकांच्या उपस्थितीने दांडी मोरयाचा धोंडा तीर्थक्षेत्र ठिकाणी जनसागर उसळला. कांदळगाव श्री देव रामेश्वर व रेवंडी श्री देवी भद्रकाली कोळंब सोमवती तीर्थक्षेत्र समुद्रकिनारी महोदय पर्वणीस उतरल्याने याठिकाणीही भक्तीसागर दिसून आला. मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून दुपारपर्यंत समुद्रस्नानासाठी भाविकाची उपस्थिती दिसून आली. या अमृत सोहळ्यानिमित्त श्री मोरेश्वर तीर्थक्षेत्रावर समुद्र स्नानासाठी हजारो भाविक-भक्तांचा जनसमुदाय लोटला. मालवणात महोदय पर्वणीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
तीन वर्षानी महोदय पर्वणी योग आल्याने मालवणात भक्तिमय वातावरण दिसून आले. मालवणात महोदय पर्वणी योगानिमित्त येणाऱ्या देवतांच्या स्वागतासाठी मालवण नगरी सज्ज झाली होती. सोमवारी रात्री ठिकठिकाणची ग्रामदेवता आपल्या रयतेसह मालवण शहरात दाखल झाल्या. रात्री देव जागरण, भजन, नामस्मरण, भक्ताच्या संकटाचे शिवकळेद्वारे निवारण, मनोरंजनासाठी ट्रिकसीन युक्त दशावतार नाट्यप्रयोग आदि कार्यक्रम झाले. काही देवता सकाळी समुद्रस्नानासाठी मालवणात दाखल झाले. मालवण येथील नागरिकांनी सड़ा-रांगोळी घालून, गुढ्या-तोरणे उभारून देवतांचे स्वागत केले. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने समुद्रात मच्छिमार बोटी व सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात आले होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात होता. मोठ्या उत्साहात महोदय पर्वणी समुद्र स्नानाचा सोहळा पार पडला.



























































