चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर आजपासून साजरा होणार धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर आज 15 व 16 ऑक्टोबर रोजी 67 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त उद्या 16 ऑक्टोबर रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व धम्म उपासकांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम होणार आहे.

विविध परिसंवाद- सामुहिक बुद्ध वंदना व बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाने दीक्षाभूमी दुमदुमणार आहे. हे दोन दिवस लाखो बौद्धबांधव चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर येण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन व दीक्षाभूमी व्यवस्थापन समितीने यासाठी जय्यत तयारी केली आहे.15 ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत एक रॅली दीक्षाभूमीकडे मार्गस्थ होणार आहे. चंद्रपूरच्या याच दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी 16 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. यामुळे या दिनाचे महात्म्य मोठे आहे. नागपूरला झालेल्या दीक्षा सोहळ्यानंतर दोन दिवसांनी येथे हा सोहळा बाबासाहेबांनी घेतला होता. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करण्यासाठी आणि बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी आज आणि उद्या येथे बौद्ध बांधवांची मोठी उपस्थिती असते.