A फॉर अॅटिटय़ूड, A फॉर अमित साद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> धनंजय साठे

नीना गुप्ता प्रोडक्शन आणि टॉरस व्हिडीओ यांची निर्मिती असलेली कालेज युवकांवर बेतलेली एक टीव्ही सीरियल 1 ऑगस्ट 2002 ला रिलीज झाली. नाव होतं ‘क्यू होता है प्यार!’ सगळेच नवे कलाकार होते. ऑडिशनसाठी आलेल्या मुलामुलींमध्ये एक असा मुलगा होता जो होंडा सिटी कारमधून आला होता. तो होता अमित साद… बाविसाव्या वर्षी त्याचातला आत्मविश्वास आणि स्टार अॅटिटय़ूड अचंबित करणारा होता.

काŸ लेज युवकांवर बेतलेली एक टीव्ही सीरियल 1 ऑगस्ट 2002 ला रिलीज झाली होती. नीना गुप्ता प्रोडक्शन आणि टॉरस व्हिडीओ यांची निर्मिती. नाव होतं ‘क्यू होता है प्यार’ स्टार प्लसवर टेलिकास्ट झाली होती. सगळं फ्रेश कास्टिंग होतं. सगळेच नवे कलाकार होते. काहीजण आयुष्यात पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार होते. त्यामुळे एक एक्साइटमेंट होती. ऑडिशनसाठी आणि एकंदर संपूर्ण प्रोसेसमध्ये मी त्या वेळी नीना गुप्ताबरोबर काम करत होतो. अख्खं प्रोडक्शन हाऊस जवळपास मीच सांभाळत होतो.

या सीरियलसाठी बरीच मुलं ऑडिशनसाठी आली होती. ‘आर्चीज’मध्ये आत्ता जे बघायला मिळतंय, त्यावेळी आमची अशीच संकल्पना होती. की ‘आर्चीस’ या कॉमिक्सवर बेतलेली या सीरियलची कास्टिंग आणि कथा असावी. त्याप्रमाणे काम सुरू झालं. ऑडिशनसाठी आलेल्या मुलामुलींमध्ये एक असा मुलगा होता जो होंडा सिटी कारमधून आला होता. सोबत स्पॉटबॉय पण होता. आम्हाला याचं आश्चर्य वाटलं की, अरे, काम नाही हातात आणि याचा ऑलरेडी स्टारसारखा अॅटिटय़ूड आहे. जणू काही 20-25 पिक्चर करून झालेत आणि मला काय गरज आहे ऑडिशनची अशा थाटात तो आला. ऑडिशन देताना शाहरुख खानचा त्याच्यावर खूप जास्त प्रभाव असल्याचं जाणवलं. आमच्या कास्टिंग डायरेक्टरला तो म्हणाला की, “मॅडम कुछ भी करो, ये जो मेन लीड का रोल हे ना, वही मुझे करना है. आप भले पैसे कम दो. मुझे उससे कुछ लेना देना नही है.” आता एवढा कॉन्फिडन्समध्ये बोलतोय म्हटल्यावर कास्टिंग डायरेक्टरने ही गोष्ट पटकन निर्मात्याना कळवली.

त्याला आतमध्ये बोलावलं. प्रोडय़ुसर त्याला भेटले. स्वत नीना गुप्ता आणि तिचे पार्टनर अनुपमजी भेटले. त्यांना मुलगा चांगला वाटला. त्याचा कॉन्फिडन्स आणि स्मार्टनेस दिल्लीचा होता. बस्स, अब मै तो फाड के रख दूंगा टाईप्सचा होता आणि त्याचं कास्टिंग झालं. त्याचं नाव होतं अमित साद! जो आपल्याला आज अनेक जाहिरातींमध्ये दिसतो. अनेक वेबसीरिजमध्ये चांगलं काम करतोय. अनेक सिनेमांमध्येही दिसतोय. तो हाच अमित साद!

बाकी व्यक्तिरेखांचे कास्टिंग झालं आणि सीरियल 1 ऑगस्टला 2002 ला ऑन एअर झाली. मलाही अमित साद एक व्यक्ती म्हणून कळायला लागला. त्यातून तो माझा मित्र झाला. अतिशय दिलदार मनाचा माणूस आहे. मी त्याला आजही खूप चांगला मित्र मानतो. त्याच्यात काही बदल झालेला नाही. भेटला की तो जुन्या मित्राबरोबर आजही जुन्या गोष्टींवर गप्पा मारतो. पहिल्यापेक्षा तो जरा हुशार व समजूतदार झालाय. आत्ता त्याला कळायला लागलंय की, आपण कुठे कुठे काय काय चुका केल्या त्याचं.

त्या वेळी ‘क्यू होता हैं प्यार’चा सेट, जैन ऑइल मिल भांडुपला लागला होता. खूप मोठा सेट होता. त्याच काळात ‘सोनपरी’चंही शूटिंग तिथेच व्हायचं. कॉलेजचा सेट लागला होता. टायटल सॉंग तिथेच शूट झालं आणि गंमत म्हणजे जी लीड अॅक्ट्रेस होती, तिच्याबरोबर याची तार काही जुळत नव्हती. ते एकमेकांशी बोलायचेच नाही. त्यांचे एकत्र सीन असायचे, कॉलेजमधले रोमँटिक सीन असायचे, पण एकमेकांशी त्यांचं कधीच पटलं नाही. तिचं नाव होतं रिवा बब्बर. तिला वाटायचं याला खूप अॅटिटय़ूड आहे आणि हा त्याच्या मस्तीत असायचा.

हा गाडीतून उतरायचा त्याच्या बॉयसोबत. हँगरवर गाडीत कपडे लावलेले असायचे. हँगरवर ब्लेझर असायचे. कुठे जायचं असेल तर तो तिथेच तयारी करायचा. विशेष म्हणजे तो गाडीतून उतरायचा आणि चक्क दात ब्रशसुद्धा करायचा. सेटवर दात ब्रश करणं, तयार होणं हे सगळं सगळ्यांना दिसायचं. पण काम खूप सुंदर करायचा. त्याला मी अनेक वेळा सांगायचो की, अरे तू शाहरुख खानला कॉपी करू नको. खूप चिडवायचो. त्याच्यावर शाहरुख खानचा प्रभाव होता. तो काळही शाहरुख खानचाच होता. ‘मै हूं ना’ वगैरे शाहरुख खानचे कॉलेज विश्व, स्टुडंट लाइफवर आधारित सिनेमांशी तो रिलेट करत असे.

एकदा मी अमितला डबिंगला बोलावलं. संध्याकाळी नऊ-साडेनऊची वेळ असेल आणि तो स्टुडिओमध्ये चक्क बनियनमध्ये आला होता. असा विक्षिप्तपणा त्याच्यात ठासून भरला होता. आल्या आल्या म्हणाला, अरे मुझे जोरो की भूक लगी है. मी म्हटलं, आम्ही पण काहीतरी जेवायला मागवायचा विचार करतच होतो. त्याने विचारलं, कुठून मागवताय तुम्ही? मी म्हटलं, नेहमीच्या रिटायर कर्नलच्या ढाब्यावरून. तो म्हणाला, फोन लगाओ, तुम ऑर्डर मत करना. मै करता हूं. चिकन बिर्याणी ठरली. मी फोन लावला आणि त्याला दिला. नीनाजी के ऑफिस से बोल रहा हुं…

आम्ही नाव न सांगता नेहमी नॉर्मल ऑर्डर द्यायचो. पण याने जोर देऊन सांगितलं, नीना गुप्ता के ऑफिस से बोल रहा हुं. नीनाजी खुद डिनर करनेवाली है. तो आप चिकन बिर्याणी एकदम अच्छे तरीके से बनाना. चिकन ढूंढना ना पडे हमको. नही तो रिटर्न कर देंगे. त्या दिवशी जी बिर्याणी आली, आहाहा लाजवाब! स्वादिष्ट!! नीनाजींच्या नावावर त्याने मस्त बिल फाडलं होतं. आज आम्ही भेटलो की मी अमितला त्या गोष्टीवरून चिडवतो. नीना गुप्ताच्या पुण्याईवर आपण मस्त बिर्याणी एन्जॉय केली याबद्दल.

त्याला बाईकची खूप आवड आहे आणि बाईकमुळे त्याला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम झाले आहेत. शूट नसताना तो कुठेतरी डोंगरावर गेला होता. तिथे बाईक स्किड झाली. हात फ्रॅक्चर झाला आणि त्याचा परिणाम शूटिंगवर झाला. त्यामुळे आम्हाला हीरोचा हात स्लिंगमध्ये दाखवावा लागला होता. ते फार महत्त्वाचे एपिसोड्स होते आणि बरोबर त्यावेळेस हा प्रकार घडला. त्याला किती समजावून सांगितलं की, अरे तुझ्या करिअरवर ज्याचा इम्पॅक्ट होईल अशा गोष्टी करायच्या नसतात. थोडं सांभाळून राहायचं. परंतु आय डोन्ट केअर असा त्याचा अॅटिटय़ूड होता.

त्यानंतर त्याने ‘क्यू होता है प्यार’चे 60 एपिसोड केले. मग तो रिप्लेस झाला. त्याला अजून एक सीरियल मिळाली होती. त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली. प्रेम जुळलं. मग तो कॅनडाला गेला. तो बिजनेस करणार असं माझ्या कानावर आलं, पण काही वर्कआऊट झालं नाही… आणि तो धाडकन परत शून्यावर आला. मग त्याला ‘बिग बॉस’ मिळाला. असं करता करता काही सिनेमा मिळाले. ‘सरकार राज’मध्ये अमिताभ बच्चनबरोबर त्याच्या कामाचं कौतुक झालं. सरकार राज थ्री, गोल्ड, सुलतान… सिनेमे मिळाले. भले तो लीड रोलमध्ये नव्हता. ती वेळ निघून गेली होती. पण काही महत्त्वाच्या व्यक्तिरेखा त्याला करायला मिळाल्या. आज तो ‘डब्रीज’सारख्या मोठय़ा वेबसीरिजमध्ये आहे.

खूप सिलेक्टिव्ह काम करतोय आणि एक चांगला माणूस म्हणून माझ्यासाठी तो नेहमीच आठवणीत राहील. बाविसाव्या वर्षी त्याच्यात तो जो काय बेफिकीरपणा होता तो आम्हाला खूप आवडला होता. आता तो खूप मॅच्युअर झाला आहे. आज जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा तो सांगतो, की यार मुझे मेरी गलती का एहसास होता है! ठीक आहे, कमीत कमी त्याला हे कळलंय हीच मोठी गोष्ट आहे.

[email protected]
(लेखक क्रिएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)