धनगर समाजाचे चौंडीतील उपोषण 21व्या दिवशी मागे, विखेंविरोधात घोषणाबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत 50 दिवसांत कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन पुन्हा एकदा राज्य सरकारने दिले आहे. या आश्वासनानंतर चौंडी येथे 21 दिवसांपासून धनगर समाजाचे सुरू असलेले उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांनी आज मध्यस्थी केली. या वेळीही धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवणारे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि खासदार सुजय विखेंविरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

धनगर आरक्षणासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे 21 दिवसांपासून ‘यशवंत सेने’चे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, सुरेश बंडगर यांच्यासह काही कार्यकर्ते उपोषणाला बसले होते. यांतील दोघांची प्रकृती खालावली होती. त्यानंतरही सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे राज्यभरात ‘चक्का जाम’ करण्याचा इशारा देण्यात आला होता. तसेच उपोषणकर्त्यांना काही झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने प्रतितिधी म्हणून गिरीश महाजन यांनी चौंडी येथे येऊन आंदोलकांशी चर्चा करून आश्वासन दिले.