
सामना प्रतिनिधी । जामखेड
मराठा आरक्षणाचा विषय गाजतोय, मात्र सरकारने मराठा अरक्षण दिले असले तरी ते न्यायालयात टिकणार नाही. तसेच सरकारने मेगा भरती सुरू केली आहे याला आमचा विरोध नाही मात्र धनगर व मुस्लिम समाज्याला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मेगा भरती होऊ देणार नाही असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी दिले.
टिपु सुलतान, बिरसा मुंडा जयंती, महात्मा फुले स्मृतीदिन व डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाहण दिना निमित्ताने जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू या ठिकाणी एम. जे. ग्रुप जामखेड यांच्या वतीने 4 डिसेंबर रोजी सार्वजनिक अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मासाळ बोलत होते.
मासाळ म्हणाले की, ‘महाराष्ट्रात मराठा, मुस्लिम, धनगर व शेतकरी आंदोलन सुरू आहेत. मात्र सरकारच्या दबावापोटी ही आंदोलने चिरडून टाळण्याचे काम सुरू आहे. मात्र हा डाव राष्ट्रवादी हाणून पाडल्याशिवाय रहाणार नाही.’
























































