
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली असून सोमवारी 18 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ऑक्टोबरनंतरची ही सर्वाधिक रुग्णनोंद आहे.
जुलै – ऑगस्टनंतर धारावीत रुग्णसंख्या घटत गेली. ऑक्टोबरनंतर रोज दोन अंकी नोंद होणारी रुग्णसंख्या एका अंकावर आली. 24 डिसेंबर 2020 मध्ये पहिल्यांदा, 22 जानेवारी 2021 ला दुसऱयांदा, 26 जानेवारीला तिसऱयांदा, 27 जानेवारीला चौथ्यांदा तर 31 जानेवारीला पाचव्यांदा आणि 2 फेब्रुवारीला सहाव्यांदा धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. मात्र मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असताना धारावीत आज एकाच दिवशी 18 नवीन रुग्ण आढळले असून मागील वर्षीच्या ऑक्टोबर 2020 नंतर ही सर्वाधिक रुग्णांची नोंद आहे.
अंधेरीत लसीकरणानंतर एकाचा मृत्यू
अंधेरीच्या एका लसीकरण केंद्रात कोरोना लसीकरणानंतर एका 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला. एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली. मुंबईत लसीकरणानंतर मृत्यू झाल्याची पहिलीच घटना आहे. लस टोचल्यानंतर 65 वर्षीय व्यक्तीला चक्कर आली. त्या व्यक्तीला दुपारी 3.50 च्या सुमारास आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल केले असता सायंकाळी 5 वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
सोमवारची रुग्णसंख्या
राज्य – 8,744
मृत्यू – 22
मुंबई – 1,008
मृत्यू – 04




























































