धुळ्याचे तापमान 2.2 अंशावर घसरले, गारठ्यामुळे शहराची गती मंदावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, धुळे

शहर आणि जिल्हय़ाच्या तापमानाचा पारा 2.2 अंशावर स्थिरावला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गारठय़ामुळे शहराची गती मंद झाली आहे. सकाळी उशिरापर्यंत नागरिक घराबाहेर पडत नाहीत. एरव्ही व्यायामासाठी बाहेर पडणारेदेखील रस्त्यावर दिसत नाहीत. सकाळी उशिरापर्यंत आणि रात्री लवकर रस्ते निमर्नुष्य होत आहेत. गारठ्यात गोरगरीबांसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने स्वेटर वाटप केले. जुने धुळे परिसरातील पांझरा किनाऱ्याच्या वडार वाडीत लहान-लहान मुलांना स्वेटर देण्यात आले.

उत्तरेकडील येणाऱ्या थंड वाऱ्यांनी जिल्हा गारठला आहे. सुमारे अठरा वर्षांनंतर धुळे शहराचे तापमान 2.2 अंश सेल्सीअस इतके घसरले आहे. यंदा जिल्हय़ात सरासरीच्या तुलनेत केवळ सत्तर टक्के पाऊस झाला. त्यामुळे हिवाळय़ात थंडी अनुभवली जाणार नाही, असा अंदाज अनेकांचा होता. पण बदललेल्या भौतिक परिस्थितीने हा अंदाज चुकीचा ठरविला आहे. हिमालयाकडून येणाऱया वाऱयांना सातपुडय़ाच्या पर्वतरागांनी अडविले आहे. तरी देखील सातपुडा पार करून आलेल्या वाऱ्यांनी खानदेश गारठला आहे. सलग दुसऱ्या दिवशी तापमान 2.2 अंश सेल्सीअस आहे. दिवसभरात वातावरणात गारठा असतो. त्यातच वारे वाहिले की हा गारठा अधिकच झोंबतो. गारठय़ाने जनजीवन विस्कळीत करुन शहराची गतीच मंद केली आहे. सकाळी आठपर्यंत नागरिक घराबाहेर पडू शकत नाही. तर रात्री आठच्या सुमारास बाजारपेठ ओस पडू लागली आहे. घटत्या तापमानात आर्थिक उलाढालदेखील मंदावली आहे.

शहरात मोठय़ा प्रमाणात गारठा निर्माण झाल्यामुळे गोरगरीबांना स्वतःचे रक्षण करणे अवघड झाले आहे. विशेषतः जुने धुळे भागातील पांझरा किनारी वडार वसाहती आहेत. कष्टकऱयांच्या या वसाहतीतील अनेक लहान मुले फाटक्या कपडय़ांवर असतात. त्यामुळे त्यांना थंडी सहन करणे कठीण झाले आहे. सामाजिक दायित्व स्वीकारत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने रविवारी जुनेधुळे परिसरातील हनुमान मंदिरात महाआरती केली. त्यानंतर नदीकाठच्या वडार वसाहतीतील मुलांना स्वेटर वितरीत केले. इतर सेवाभावी संस्थांनीदेखील गोरगरीबांना गरम कपडे दिल्यास त्यांना थंडी सहन करणे शक्य होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. स्वेटर वाटपाच्यावेळी राजेश पाटील, अमर पाटोले, रवी देसर्डा, मनोज जैन, निलेश रुणवाल, गुलाब माळी, सुनिल गोयर, हरी मुंदडा, शेखर मराठे, समाधान पाटील, ईश्वर पवार, विनोद सोमानी, महावीर बाफना उपस्थित होते.