
सध्या हिंदुस्थानात 72 दशलक्ष नागरिक मधुमेहग्रस्त आहेत. हेच प्रमाण येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दर्शविलेल्या अंदाजानुसार हिंदुस्थनात 2030 पर्यंत हा आकडा 98 दशलक्षवर पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, या गंभीर स्वरूपाच्या आजारांमध्ये कालांतराने त्यातून इतर अनेक गुंतागुंती उद्भवू शकतात. ज्यात कार्डिओव्हॅस्क्युलर देखील समावेश असल्याचे सांगण्यात येत आहेत.
इंडियन नॅशनल हार्ट फेल्युअर रजिस्ट्रीच्या निरिक्षणानुसार मधुमेह असलेल्या रुग्णांपैकी 70 टक्के रुग्णाहून अधिक रुग्ण हे कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांनी मृत्यू पावतात. हार्ट फेल्युअर हा असाच एक आजार आहे. हार्ट फेल्युअरशी निगडित मृत्यूंचा दर आश्चर्यकारकरित्या जास्त असल्याचे व या आजाराचा त्रास असलेल्या 44 टक्के हून अधिक रुग्णांच्या बाबतीत मधुमेह हेच त्याचे मूळ कारण असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबद्दल ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. देव पहलाजानी यांनी सांगितले की, इस्केमिक हृदयविकार आणि मधुमेह व हायपरटेन्शनसारख्या चिवट विकारांचे प्रमाण वाढीस लागल्याने हार्ट फेल्युअरच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तेव्हा मधुमेहाच्या रुग्णांनी धाप लागणे, सततचा थकवा आणि आळस, ग्लुकोजच्या पातळीतील अनिर्बंध वाढ आणि पायाचे घोटे, पाय आणि पोट फुगवटा वाटणे यांसारख्या लक्षणांकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे,असे त्यांनी यावेळी सांगितले. तर शाररिक हालचाली महत्वाच्या असून सकस आहार घेण्याचा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.
मधुमेह नियंत्रित, रहा सुरक्षित! पालिकेची मधुमेह जनजागृती मोहीम
‘सायलेंट किलर’ असलेल्या मधुमेहाला दूर ठेवण्यासाठी दररोज पुरेसा व्यायाम करा आणि संतुलित आहार घेऊन ‘मधुमेह नियंत्रित सुरक्षित रहा’ असे आवाहन पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी केले आहे. मधुमेहाला दूर ठेवण्यासाठी आजच्या जागतिक मधुमेह दिनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून आजपासून विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आयुक्त बोलत होते.
‘आयडीएफ’च्या अनुसार या वर्षाच्या मोहिमेचा आशय ही ‘परिचारिका आणि मधुमेह’ असा आहे. पालिकेद्वारे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची काळजी, प्रतिबंध आणि उपचार यामध्ये परिचारिकेच्या भूमिकेस प्रोत्साहन देण्यात येत आहे. पालिकेच्या 144 दवाखान्यांमध्ये मधुमेहाबाबत समुपदेशकसेवा उपलब्ध आहे. दरम्यान, ‘इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशन’ (आयडीएफ) च्या अंदाजानुसार, हिंदुस्थानात मधुमेहाचे 77 दशलक्ष (7.7 कोटी) रुग्ण आहेत आणि सन 2045 पर्यंत हे प्रमाण दुप्पट होईल, असाही अंदाज आहे. ‘आयसीएमआर’च्या सर्वेक्षणानुसार (2017 शहरी लोकसंख्या) मुंबईमध्ये मधुमेहाचे प्रमाण 10.90 टक्के आणि ‘मधुमेह- पूर्व- स्थिती’चे प्रमाण 15 टक्के इतके आहे. मात्र मधुमेह आणि हृदयविकार हे आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करून रोखता येतात.





























































