संचित – एका शिल्पकाराची गोष्ट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

महात्मा गांधींच्या निर्वाणानंतर दिल्लीत त्यांचा पहिलाच पुतळा उभारावा असं दिल्ली महापालिकेने ठरवलं आणि ऐन पंचविशीत असलेल्या मराठी शिल्पकाराने निश्चय केला, ‘आपण हे काम मिळवायचं!’ निर्धार करणाऱया तरुणाचं नाव होतं सदाशिव दत्तात्रय साठे. महाराष्ट्राची शिल्पपरंपरा समृद्ध करण्यात भाऊसाहेब तथा सदाशिव साठे हे एक मोठं नाव. त्यांना भेटण्याचा आणि ते चित्रित करण्याचा योग आला तो आनंदाचा क्षण!

आपल्या देशातल्या प्राचीन शिल्पकलेचं अप्रतिम रूप अनेक मंदिरं, राजवाडे आणि वेगवेगळय़ा वास्तूंमध्ये दिसून येतं. देशातल्या सुमारे बाराशे लेण्यांपैकी जवळपास आठशे लेणी आपल्या महाराष्ट्रात आहेत. सह्याद्रीच्या कातळात आधी गुंफा निर्माण करून तिथे अद्वितीय शिल्पांची निर्मिती ज्या अनाम कलाकारांनी केली त्यांच्याविषयी आपण कृतज्ञ असायला हवं. या पाषाणातील शिल्पांविषयी पुन्हा सविस्तर माहिती घेऊच, परंतु विविध माध्यमांचा वापर करून मूर्तिकार, प्रतिमाकार जी शिल्पं बनवतात त्यात माती, लाकूड, धातू आणि काळय़ा पाषाणांपासून शुभ्र संगमरवराचे प्रकार येतात. प्रत्येक मूर्तीचं सौंदर्य निराळं. त्यात स्पर्धा नाही.

ब्रिटिश राजवटीपूर्वीची आपल्याकडची बहुतेक शिल्पं देवादिकांची आणि पुराणकथांवर आधारित आहेत. युरोपात व्यक्तींचे धातूचे भव्य पुतळे मोठय़ा प्रमाणावर घडवले गेले आणि ती कलाही आत्मसात करत हिंदुस्थानी कलाकारांची गेल्या दीड-दोनशे वर्षांत भव्य पुतळे बनवले. देशातला सर्वात मोठा, सरदार पटेल यांचा पुतळा मराठी शिल्पकार राम सुतार यांनी घडवला. तो अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवीच्या पुतळय़ापेक्षाही भव्य आहे.

महात्मा गांधींच्या निर्वाणानंतर दिल्लीत त्यांचा पहिलाच पुतळा उभारावा असं दिल्ली महापालिकेने ठरवलं आणि ऐन पंचविशीत असलेल्या मराठी शिल्पकाराने निश्चय केला, ‘आपण हे काम मिळवायचं!’ निर्धार करणाऱया तरुणाचं नाव होतं सदाशिव दत्तात्रय साठे. मी त्यांना 2012 मध्ये त्यांच्या घरी भेटलो आणि एक विलक्षण शिल्पानुभव चित्रित झाला.

भाऊसाहेब साठे यांचं वय त्यावेळी ऐंशीपार गेलेलं होतं. मात्र त्यांना गांधीजींच्या पुतळय़ाच्या निर्मितीचा ‘प्रवास’ चित्रपटासारखा नजरेसमोर दिसत होता. ते सांगत राहिले, ‘…दिल्लीला जायचं ठरवलं खरं, पण देशभरातल्या त्या काळातल्या नामांकित शिल्पकारांपुढे आपला निभाव कसा लागणार हा प्रश्नच होता. सुदैवाने त्यावेळी दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चिंतामणराव देशमुख, काकासाहेब गाडगीळ अशी बरीच मराठी माणसं महत्त्वाच्या पदांवर होती. चिंतामणरावांची भेट झाली तेव्हा त्यांना विचारलं, तुमचा अर्धपुतळा बनवायला थोडा वेळ द्याल का? त्यांनीही ‘सीटिंग’ दिली आणि तो पुतळा त्यांना खूप आवडला. दिवाणखान्यात ठेवलेला हा पुतळा त्यांच्याकडे येणाऱया अनेक मातब्बर मंडळींचं लक्ष वेधून घेत होता. माझ्या नावाची चौकशी होत होती. त्यामुळे हुरुप वाढला.’

मग साठे यांनी एका परिचिताच्या जागेत गांधीजींची मुद्रा बनवण्याचं ठरवलं. माती किंवा मधे क्ले मेघ त्यांनी गांधीजींची एक भावमुद्रा साकारली. गांधीजींचे सचिव प्यारेलाल आणि त्यांच्या सहकारी डॉ. सुशीला नायर ते शिल्प पाहायला आल्या. भाऊसाहेब त्यावेळी तिथे नव्हतेच, पण या मंडळींना, मी बनवलेल्या चेहऱयातून त्यांचे ‘बापू’ गवसले हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता.’ असं भाऊसाहेब भारावून सांगत होते. नंतर पुतळय़ाचं उद्घाटन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झालं तेव्हा पंडित नेहरूही हजर होते. फोटोग्राफर त्यांचे फोटो काढू लागले तेव्हा ते म्हणाले, ‘…अरे एवढा अप्रतिम पुतळा तयार करणाऱया शिल्पकाराचे फोटो काढा.’ भाऊसाहेब त्या स्मृतीक्षणांनी गहिवरले. त्यांनी म्हटलं ‘नेहरूंनी मला स्टेजवर बोलावून सन्मान केला. फोटो काढले गेले!’ आजही तो फोटो साठे कुटुंबाच्या संग्रही आहे. हा पुतळा दिल्लीऐवजी मुंबईत ज्येष्ठ शिल्पकार श्यामराव म्हात्रे यांच्या सुसज्ज फाऊन्ड्रीमध्ये घडवला गेला आणि विशेष ट्रेनने दिल्लीला नेण्यात आला.

गणेशोत्सवातल्या विविध मूर्ती बघताना भाऊसाहेबांची आठवण झाली. कारण बालवयात काकांकडून गणपतीच्या मूर्ती बनवायला शिकलेल्या सदाशिवराव साठे यांनी नंतर ‘गेट वे आाफ इंडिया’जवळचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारला आहे. पुरंदर गडावरचं मुरारबाजी देशपांडे यांच्या लढाऊ आवेश प्रगट करणारा पुतळाही त्यांनीच घडवलाय.

भाऊसाहेबांचा मुलगा सिद्धार्थही उत्तम शिल्पकार आहे. शिल्पालय नावाची त्यांची शिल्पशाळा किंवा फाऊन्ड्री डोंबिवलीत आहे. आम्ही ती पाहिली. तिथेच भाऊसाहेब त्या वयातही, दांडी यात्रेला निघालेल्या गांधीजींचं शिल्प बनवतानाही पाहिले. भाऊसाहेब सांगत होते मुशीतून मूर्ती साकारण्याचा उल्लेख अगदी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील 279व्या ओवीत येतो तो असा – तातलिये मुसे। मेण निघोनि जाय तैसे। कोंदली राहे रसे। वोतलेनि।।… ही महाराष्ट्राची शिल्पपरंपरा पुढे, म्हात्रे, फडके, करमकर,सोनवडेकर आदी नामांकितांनी समृद्ध केली. भाऊसाहेब साठे हे त्यातलंच एक मोठं नाव. त्यांना भेटण्याचा आणि ते चित्रित करण्याचा योग आला तो आनंदाचा क्षण!
[email protected]