निरागस व्यक्ती सोडून जाते तेव्हा अस्वस्थ व्हायला होतं! विजू मानेंची भावूक पोस्ट

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे मंगळवारी कोरोनाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. दिग्दर्शक विजू माने यांनी दिवंगत किशोर नांदलस्कर यांच्या आठवणी जागवल्या आहेत. एका भावूक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

विजू माने लिहितात, ‘किशोर नांदलस्कर गेल्याची बातमी आली. क्षणभर निशब्द व्हायला झालं. मी २०१४ साली एक सिनेमा केला होता. ज्यात त्यांनी काम केलं होतं. अर्थात त्याआधी मी त्यांच्यासोबत एक व्यावसायीक नाटकसुध्दा केलं होतं. त्याच्याही अनेक आठवणी आहेत. पण ही आठवण विशेष रुखरुख लावणारी आहे.
त्या सिनेमात मी एक गाणं केलं होतं. ज्यात एका वृद्धाश्रमात एका जोडप्याचा लग्नाचा वाढदिवस सुरु आहे. मला तेव्हा रमेश देव ह्यांनी निक्षून सांगितलं होतं की मला ह्या गाण्यावर नृत्य करायचंय. ते गाणं चित्रित होत असताना रमेश देव, सीमा देव, उदय सबनीस, विजू खोटे, स्वतः नांदलस्कर सगळी मंडळी नृत्य एन्जॉय करत होती. एका ब्रेक मध्ये किशोर नांदलस्कर मला बाजूला घेऊन गेले आणि म्हणाले, “रमेश देवांच वय किती असेल रे ?” मी म्हटलं “असेल ८० वगैरे.” मग त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले,”मी ८० वर्षाचा होईन तेव्हा माझ्यासाठी असं एखादं गाणं करशील असं मला वचन दे” आणि त्यांचे ते भरून आलेले डोळे अजूनही आठवतायत. एका इतक्या भन्नाट कलाकाराची केवढीशी अपेक्षा होती…तेव्हा मी त्यांना वचन दिलं. पण पूर्ण करण्याची वेळच आली नाही …. सतत अचूक टायमिंगने सेटवरचं वातावरण हलकं फुलकं करणारी अशी निरागस व्यक्ती सोडून जाते तेव्हा अस्वस्थ व्हायला होतं…सगळ्यांनी काळजी घ्या….” अशा शब्दांत त्यांनी किशोर नांदलस्कर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या