दिशा सालियान प्रकरण, नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ, महापौरांच्या तक्रारीची घेतली दखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिशा सालियान या तरुणीची बलात्कार करून हत्या करण्यात आली, असे तथ्यहीन आरोप केंद्रीय सूक्ष्म व लघुउद्योगमंत्री नारायण राणे पत्रकार परिषदेतून करीत आहेत.  राजकीय आकसापोटी तसे आरोप करून दिशाची नाहक बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे दिशाची बदनामी करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी लेखी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे केली. या मागणीची आयोगाने दखल घेत 48 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश मालवणी पोलीस ठाण्यास दिले आहेत.

दिशा सालियान हिचा मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयकडून तिच्या मृत्यूचा तपास करण्यात आला. शिवाय शवविच्छेदन अहवालात दिशावर बलात्कार झाला नसून तसेच ती गरोदर नव्हती, असेही स्पष्ट झाले आहे. तिच्या आईवडिलांनीदेखील कोणतीही हरकत घेतली नव्हती. असे सर्व चित्र स्पष्ट असताना पेंद्रीय मंत्री नारायण राणे हे पत्रकार परिषद घेऊन दिशाचा बलात्कार करून हत्या केल्याचा वारंवार आरोप करीत आहेत. या राजकीय आरोपातून दिशाची बदनामी करण्यात येत असून तिच्या आईवडिलांसाठी ही अत्यंत दुर्दैवी व वेदनादायक बाब आहे. त्यामुळे दिशाची तिच्या मृत्यूनंतर होणारी बदनामी तत्काळ थांबविणे गरजेचे असून ही बदनामी करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र मुंबईच्या महापौरांनी राज्य महिला आयोगाकडे पाठवले होते. या मागणीची तत्काळ दखल घेत 48 तासांमध्ये याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना दिले असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.