
सध्या सोशल मीडियावर सर्फिंग करताना अचानक काही व्हिडीओ आपले लक्ष वेधतात. त्यात एक तरुणी कार्डबोर्ड, पुठ्ठा आणि टाकाऊ वस्तूंपासून शोभिवंत वस्तू बनवताना दिसते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने त्या वस्तू घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायच्या याबाबत ती प्रशिक्षण देते. ही तरुणी आहे पुण्याची 26 वर्षीय स्नेहल. ‘पुणेकर स्नेहा’ या नावाने सोशल मीडियावर ती लोकप्रिय असून तिच्या अफलातून क्रिएटिव्हिटीचे व्हिडीओस् तुफान व्हायरल होत आहेत.
एम.कॉम.पर्यंत शिक्षण घेतलेल्या स्नेहलला लहानपणापासून कलेची आवड आहे. शिक्षणामुळे तिची ही आवड काहीशी मागे पडली होती. 2017 साली तिने स्वतःचे यूटय़ूब चॅनेल सुरू केले. सध्या यूटय़ूबला तिचे पाच लाख सबस्क्रायबर तर फेसबुकला दोन लाख फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवरील तिच्या व्हिडीओस्लादेखील लाखोंच्या घरात व्ह्यूज आहेत. आपल्या प्रवासाविषयी स्नेहल म्हणाली, माझी कला सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी मी यूटय़ूब चॅनेल सुरू केले. सुरुवातीला मोर कसा तयार करायचा याबाबतचा एक व्हिडीओ चॅनेलवर पोस्ट केला होता. घरामध्ये माती नसल्यामुळे कणिकापासून मोर तयार केला. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर न्यूज पेपर, कार्डबोर्ड, यूज ऍण्ड थ्रो ग्लास, शॅम्पूच्या रिकाम्या बॉटल्स, पुठ्ठा आदींपासून शोभिवंत वस्तू कशा पद्धतीने तयार करायच्या याचे व्हिडीओ अपलोड केले. खासकरून गृहिणींना सहज उपलब्ध होतील अशा साहित्यापासून शोभिवंत वस्तू तयार करण्यावर माझा भर असतो.
गृहिणींना मिळाली प्रेरणा
स्नेहल पुढे म्हणाली, सोशल मीडियामुळे माझ्या कलेला व्यासपीठ मिळाले आहे. घरबसल्या मला ऑर्डर मिळतायत. विशेष म्हणजे, माझे व्हिडीओस् पाहून अनेक गृहिणींना प्रेरणा मिळाली आहे. काहींनी मी सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करून स्वतःच्या घराची आकर्षकरीत्या सजावट केली आहे, तर काहींनी घरबसल्या ज्वेलरी मेकिंग, वॉल हँगिंग, फ्लॉवर आणि डॉल मेकिंगसारखे व्यवसाय सुरू केले आहेत. घरच्या घरी बाप्पाची इकोफ्रेंडली सजावट कशी करायची याचे काही व्हिडीओस् मी नुकतेच अपलोड केले आहेत. त्यालाही तुफान प्रतिसाद मिळतोय.





























































