
राज्य शासनाकडून आलेल्या 70 हजार 295 मोफत पाठ्यपुस्तकांचे संगमेश्वर तालुक्यात केंद्रानुसार वाटप करण्यात आले. केंद्रप्रमुख व शिक्षकांनी वाहनाच्या माध्यमातून प्राप्त पाठ्यपुस्तके तालुक्याच्या ठिकाणाहून केंद्र ठिकाणी नेली आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने मोफत पाठ्यपुस्तक वाटप, शालेय गणवेश वाटप, पोषण आहार आदी विविध योजना अमलात आणली आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. संगमेश्वर तालुक्यात 8 बीट व 37 केंद्र आहेत.
संगमेश्वर तालुक्यात पहिलीसाठी 6 हजार 556, दुसरीसाठी 5 हजार 164, तिसरीसाठी 6 हजार 635, चौथीसाठी 7 हजार 580, पाचवीसाठी 9 हजार 252, सहावीसाठी 10 हजार 374, सातवीसाठी 12 हजार 96, आठवीसाठी 12 हजार 140 अशी एकूण 69 हजार 797 पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली होती. यानुसार पहिलीसाठी 5 हजार 594, दुसरीसाठी 4 हजार 556, तिसरीसाठी 5 हजार 619, चौथीसाठी 8 हजार 672, पाचवीसाठी 12 हजार 932, सहावीसाठी 9 हजार 750, सातवीसाठी 10 हजार 998 व आठवीसाठी 12 हजार 174 अशी एकूण 70 हजार 295 पाठ्यपुस्तके सर्वशिक्षा अभियानाकडे प्राप्त झाली आहेत. या पाठ्यपुस्तकांचे गुरुवार व शुक्रवारी केंद्रानुसार वाटप करण्यात आले.
देवरुख नं. 1 व 2, साखरपा व देवळे या बिटमधील केंद्रांना तसेच माखजन, कडवई, संगमेश्वर, कोळंबे या केंद्रांना पाठ्यपुस्तकांचे वाटप गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवणे, मयुरी जोशी, सायली शिंदे, विनोद पाध्ये, सर्वशिक्षा अभियानाचे आहे समीर काबदुले ,कलाश्री मोहिते, गिरीजा होतेकर, शांतेश्वर ढवळे, सानिका भीतळे, परमेश्वर मेतलवार, अमोल कांबळे, प्रकाश शिंदे, प्रताप बर्गे उपस्थित होते. केंद्रप्रमुख व शिक्षकांनी ही पुस्तके तालुक्याच्या ठिकाणाहून केंद्राच्या ठिकाणी नेली.
अजूनही पहिलीसाठी 962, दुसरीसाठी 608, तिसरीसाठी 1 हजार 16, सहावीसाठी 624 व सातवीसाठी 1 हजार 98 अशा एकूण 4 हजार 308 पाठ्यपुस्तकांची आवश्यकता आहे. ही अपुरी पाठ्यपुस्तके लवकरात लवकर प्राप्त व्हावी अशी मागणी शिक्षण विभागाच्या वतीने वरिष्ठ स्तरावर करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुका मोठा असून ग्रामीण भाग सर्वाधिक आहे. तालुक्यातील शाळा या डोंगरात वसलेल्या आहेत. मोफत पाठ्यपुस्तके तालुक्याच्या ठिकाणाहून वितरित केले जातात. यामुळे दुरहून येणाऱ्या केंद्रप्रमुख व शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. केंद्रप्रमुख व शिक्षक पदरमोड करून हे पाठ्यपुस्तके तालुक्याच्या ठिकाणाहून केंद्र ठिकाणी नेत आहेत. हीच पाठ्यपुस्तके केंद्राच्या ठिकाणी उपलब्ध झाल्यास सोयीचे ठरणार आहे. होणारा वाहतुकीचा खर्च देण्यास शिक्षक वर्ग तयार आहेत याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.




























































