दिवाळीपूर्वी वीजबिलाचा निर्णय, ऊर्जामंत्र्यांचा दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊन काळात विजेचा वापर वाढल्याने ग्राहकांना वाढीव वीज बिले आली आहेत. त्यामधून त्यांना दिलासा देण्यासाठी चर्चा सुरू असून दिवाळीपर्यंत नक्कीच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास सोमवारी
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला.

मुंबईचा वीजपुरवठा खंडित झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी टाटा पॉवरच्या ट्रॉम्बे येथील वीज केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचे स्रोत थांबलेले असतानाच वीज वापर वाढल्याने ग्राहकांना वाढीव वीज बिलाची झळ बसली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय होईल असे त्यांनी सांगितले. मुंबईत 1981 पासून आयलँडिंगची यंत्रणा असतानाही 12 ऑक्टोबर रोजी मुंबईचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे मुंबईच्या अखंडित वीज पुरवठय़ासाठी आणखी उपाययोजना करणे, आयलँडिंग यंत्रणा सुधारणे, अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत उर्जामंत्र्यांनी निर्देश दिले. तसेच सध्या मुंबईला रॅडीकल ट्रान्समिशन पद्धतीने वीज आणली जाते. त्यामुळे एखाद्या वीज वाहिनीत बिघाड झाला तर मोठी समस्या उभा राहते. त्यामुळे भविष्यात मुंबईला रिंगलाईनने वीज पुरवठा करण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वीज कंपन्यांमधील समन्वयासाठी कार्यक्षम संदेशवहन यंत्रणा उभारा

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला अखंडित वीज पुरवठा करता यावा, 12 ऑक्टोबरची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महापारेषण, एसएलडीसी, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये समन्वय साधण्यासाठी कार्यक्षम संदेशवहन यंत्रणा तयार करण्याचे निर्देश यावेळी उर्जामंत्र्यांनी दिले.

टाटाच्या बंद वीज संचातून वीज घेण्याबाबत विचार

मुंबईची विजेची मागणी 2030 पर्यंत पाच हजार मेगावॅटपर्यंत जाणार आहे. त्यामुळे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी टाटांच्या सध्या बंद असलेल्या ट्रॉम्बे येथील दोन वीज संचातून वीज घेण्याबाबत विचार सुरू आहे. पण त्याचा दर ग्राहकांना परवडणारा असावा हेही पहावे लागेल असे उर्जामंत्र्यांनी सांगितले.