संभाजीनगर- दोन तास फटाके फोडण्याची मुभा

दिवाळी सणानिमित्त प्रदूषण रोखण्यासाठी नागरीकांना रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत फटाके फोडण्याची मुभा देण्यात आली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून नागरिकांनी हरित फटाके फोडावेत, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार पऱिषदेत केले.

दिवाळी सणानिमित्त प्रदूषण रोखण्यासाठी फटाके फोडण्याबाबत सर्वोच्च न्यायालय आणि ग्रीन ट्रिब्युनलने निर्बंध घातले आहेत. या आदेशानुसार शहरात यंदा दिवाळीला हरित आणि प्रदूषण मुक्त फटाके फोडून दिवाळीचा पर्यावरण संवर्धनाच्या कामात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करत पोलीस आयुक्त निखिल गुप्ता पुढे म्हणाले की, याबाबत नुकतेच कोर्टाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. या आदेशानंतर शहरात फटाक्याबाबत आचारसंहिता लागू करण्यात आली असून, दिवाळी सणाच्या वेळी शहरातील नागरिकांना रात्री 8 ते 10 वाजेदरम्यान फटाके फोडता येणार आहेत. मोठ्या आवाजाचे फटाके आणि लड लावता येणार नाही. यासह शहरात जे भाग सायलेन्स झोन म्हणून जाहीर केले आहेत. अशा भागांमध्येदेखील फोडण्याबाबत निर्बंध टाकण्यात आलेले आहेत. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सुनिल चव्हान यांनी सांगितले की, शहरात दिवाळीनंतर प्रदूषणाची पातळी तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे एक पथकही शहरात तैनात करण्यात आलेले आहे. दिवाळीच्या सात दिवसां पूर्वीचे शहरातील प्रदूषण आणि दिवाळीच्या सात दिवसांनंतरचे प्रदूषण मोजले जाणार आहे. दिवाळीचा सण साजरा करताना काही नियमांची अंमलबजावणी नागरिकांनी करावी, असेही आवाहन डॉ. गुप्ता यांनी केले.

नागरिकांनी फटाके खरेदी करताना हरित फटाके किंवा सुधारित फटाके, असा उल्लेख असलेले प्रदूषण कमी करणारे फटाकेच खरेदी करावे. फटाक्यांची लड किंवा जास्त वेळ फुटणारे फटाके विकत घेऊ नयेत. फटाक्यांची ऑनलाईन खरेदी करू नयेत. तसेच बेरियम सॉल्ट, लिथियम मर्क्युरी असे प्रदूषण विरहित फटाक्यांची खरेदी करण्यात येऊ नये. 120 डेसीबलपेक्षा जास्त ध्वनिप्रदूषण करणारे फटाके फोडू नये, असे आवाहन देखील आयुक्तांनी केले आहे.