दिवाळी अंक : वास्तव आणि स्वप्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  संजय जोशी

आपल्याकडे शंभर वर्षांचा इतिहास असल्यामुळे मराठी माणसाचा ऊर भरून यावा अशा नाटय़संगीत, दिवाळी अंक, बालगंधर्व… वगैरे मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या पण आजच्या तरुणाईला विशेष देणेघेणे नसलेल्या गोष्टींची यादी मोठी आहे. त्यापैकी ‘दिवाळी अंक’ ही एक खास गोष्ट आहे.

आपल्याकडे शंभर वर्षांचा इतिहास असल्यामुळे मराठी माणसाचा ऊर भरून यावा अशा नाटय़संगीत, दिवाळी अंक, बालगंधर्व… वगैरे मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या पण आजच्या तरुणाईला विशेष देणेघेणे नसलेल्या गोष्टींची यादी मोठी आहे. त्यापैकी ‘दिवाळी अंक’ ही एक खास गोष्ट आहे. ‘मस्त अभ्यंगस्नान करून, सुरेख भरपेट फराळ करून पक्वान्नाच्या जेवणाच्या वेळेपर्यंत दिवाळी अंक वाचत पहुडणे ही खरी दिवाळी’ यासारखी मराठी मनाला कुरवाळणारी वाक्येदेखील वारंवार ऐकवली जातात. 1909 सालच्या काशिनाथ मित्र यांनी काढलेल्या ‘मनोरंजन’च्या पहिल्या दिवाळी अंकानंतर गेली शंभरावर वर्षे दरवर्षी वाढत वाढत आता पाचेकशे दिवाळी अंक मराठीत निघतात आणि त्यांची उलाढाल दहा-बारा कोटींवर पोचली आहे. कदाचित जास्तही असेल. पण ही संख्या अलीकडे उतरत चालली आहे अशीही चर्चा आहेच. पुण्यातल्या पूनम एजन्सीचे भुतडा गहिवरून सांगतात, ‘जोशीबुवा, काय सांगू तुम्हाला एके काळची गोष्ट. तेव्हा रात्री ‘आवाज’च्या दिवाळी अंकांचा ट्रक यायचा त्यावेळी आमच्या आप्पा बळवंत चौकात सगळ्या विक्रेत्यांनी लावलेली फटाक्यांची माळ किती तरी वेळ चालायची… गेले ते दिवस!’

इतिहासाचे पुनर्मूल्यांकन करायचे आपल्याला वावडे आहे. याचे खरे आणि बोचणारे कारण असे की, नव्या पिढीशी वेग न राखू शकलेल्या जुन्या पिढीला आत्मसन्मानाचे एकमेव साधन म्हणजे इतिहासाचे उदात्तीकरण हे असते आणि नव्या युगाशी वेग राखताना तारांबळ उडालेल्या नव्या पिढीला इतिहासावर घालवण्याइतका वेळ आणि रसच नसतो. त्यामुळे जुनी पिढी सुखेनैव इतिहासाचे गोडवे गाते आणि नवी पिढी त्याला हिंग लावून विचारत नाही. आपल्या अंगावर रोमांच उभे करणाऱया बहुतांश गोष्टींबाबत हीच अवस्था आहे. त्यात दिवाळी अंकदेखील आलेच. मात्र एक गोष्ट मान्य करायला हवी की, पाच-सहा दिवाळी अंक विकत घेणे, वीस-पंचवीस दिवाळी अंक इतरांकडून / लायब्ररीतून आणून वाचणे ही परंपरा या मंडळींनी वर्षानुवर्षे चालवली. त्यातूनच अनेक लेखक आणि दिवाळी अंकांची नावे प्रतिष्ठा पावली.

ही परंपरा अभिमान वाटावी अशीच आहे. मी स्वतः निवडक असे दहा बारा अंक विकत आणतो आणि इतर दहा-पंधरा अंक वाचतो, (बऱयाच वेळा स्वतःच लिहिल्यामुळे काही अंक विकत आणावे लागत नाहीत.) आणि दिवाळीनंतर दोनेक महिने साहित्यिक आणि इतर मित्रमैत्रिणीत दिवाळी अंकांविषयी बोलत असतो. एक लेखक, वाचक आणि निरीक्षक म्हणून आलेल्या त्या अनुभवावर काही परखड निरीक्षणे नोंदवणार आहे. (त्यातच यंदा ‘साहित्य सूची’च्या दिवाळी अंकाचे संपादन केल्याने तोही अनुभव आहेच.)

पहिलं म्हणजे एके ठिकाणी वाचनात आलं की, मर्यादित साक्षरतेच्या त्या विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात ‘मासिक मनोरंजन’चे वीस हजारांवर वर्गणीदार होते. आज साक्षरता इतकी वाढलेली आहे, सुबत्ता आहे पण मराठीतल्या प्रमुख नियतकालिकांचा सर्वांचा मिळून तरी वर्गणीदार तेवढा आहे का? आज तीन-चार हजार वर्गणीदार म्हणजे डोक्यावरून पाणी. हे चित्र केवळ धक्कादायक नाही तर लाजिरवाणे आहे. आज एका वेळी हॉटेलमध्ये गेलं तरी सहज हजार रुपये उडवणारे मराठी लोक त्याच पैशात पुढचे तीन-चार महिने वाचता येतील असे दिवाळी अंक घेत नाहीत. शिवाय 1909 सालच्या त्या पहिल्याच दिवाळी अंकात दहा बारा स्त्राr लेखकांचे कसदार लेखन होते हेही उल्लेखनीय आहे. ‘मनोरंजन’नंतर किर्लोस्कर, दीपावली, हंस यासारख्या अनेक दिवाळी अंकांनी दर्जेदार दिवाळी अंकांची परंपराच सुरू केली आणि आजचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दिवाळी अंकांबद्दल गहिवरून जाणारे वाचकच हा लेख वाचतील बहुतेक, त्या इतिहासाबद्दल अभिमान बाळगताना त्याच्या पलीकडे जाऊन वास्तवाचा वेध घ्यायला हवा.

थोडा बारकाईने विचार करा, 500 दिवाळी अंकांच्या निर्मितीत संपादक, मुद्रक, चित्रकार, लेखक वगैरे सगळे मिळून काम करणाऱया हजारो जणांनी दोन-तीन महिन्यांत फार तर दहा-बारा कोटींची उलाढाल करणे म्हणजे काही फार मोठी गोष्ट नव्हे. कोणत्याही बऱयापैकी चालवलेल्या उद्योगात याच्या अनेकपट उलाढाल सहज होते. पण आपण छापील कागदाला उत्पादन मानत नाही तर साहित्यशारदेची सेवा वगैरे ढोंग करत राहतो आणि ही वेळ येते. झालं काय की, टीव्ही, सिनेमे वगैरे बाकीच्या हुशार बिरबलांनी आपापल्या रेषा मोठय़ा केल्या आणि आमची रेषा अधिकाधिक छोटी होत गेली हे खरे वास्तव आहे. आम्ही बसलो इतरांच्या रेषा आमच्या दुबळ्या वाचाळ खोडरबराने खोडायचा रडीचा डाव खेळत. बरे साहित्यशारदेची सेवा म्हणत आम्ही साहित्याचे शुद्ध स्वरूप तरी राखले आहे का? तिथेही बोंबच आहे. गेल्या तीनेक दशकात जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात घुसलेल्या ‘उपयुक्ततावादी’ तत्त्वज्ञानाने साहित्यक्षेत्राला देखील पुरते ग्रासून टाकले आहे. निखळ साहित्य सोडून इतर गोष्टींची भरताड असणारे अनेक दिवाळी अंक याची साक्ष आहेत. आरोग्य, पर्यटन, नटनटय़ांच्या मुलाखती, राजकीय-सामाजिक चर्चासत्रे, भविष्य, पाककला अशा भरगच्च मजकुरातून अभिजात वाचकाला श्रीमंत करणारे दर्जेदार ललित साहित्य कितीसे असते? त्यातही कस गेलेल्या म्हाताऱया, पण एके काळी बरं लिहिल्यामुळे विख्यात होऊन बसलेल्या लेखकांचे बंडल साहित्य हेच अनेक नावाजलेल्या दिवाळी अंकांचे अनुक्रमणिका सजवण्याचे हातखंडा साधन. लेखन हा एक असा मस्त धंदा झालाय की, जिथे स्वेच्छानिवृत्ती सोडाच, सक्तीची निवृत्तीदेखील लागू नाही. नवे लेखक शोधायची तसदी नको म्हणून काही संपादक आळशीपणे एप्रिल-मे महिन्यात या हातखंडा म्हाताऱयांना पत्रे रवाना करतात. फेसबुक वगैरे समाजमाध्यमावर सजग वावर असेल तर अनेक ताज्या दामाचे सशक्त लेखक तिथेदेखील सापडू शकतात. नवे लेखक शोधून, त्यावर संपादकीय संस्कार करत, दर्जा वाढवायचे प्रयत्न करायला हवे.

जाहिराती हा कोणत्याही सर्जनशील उपक्रमाला मिळणारा एक ‘धोकादायक वर’ आहे. ‘वर’ अशासाठी की काही उत्तम प्रकल्प अशा ‘स्पॉन्सरशिप’मुळेच तग धरू शकतात आणि ते सर्वथा योग्यच आहे. पण धोकादायक अशा अर्थाने की, एकदा या शस्त्राची शक्ती कळली की केवळ जाहिरातींसाठी अंकाचा नूर बदलला जातो, काही वेळा तर त्यासाठीच अंक काढला जातो आणि हळूहळू वाङ्मयीन प्रयोजनच हरवून जाते. तो एक निव्वळ धंदा होतो. धंद्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणारी साहित्यसेवा जितकी निरर्थक तितकेच साहित्यिक प्रयोजनालाच फाटा देणारा धंदा करणे गर्हणीय आहे. अशामुळे दिवाळी अंकांची संख्या आणि उलाढाल वाढते पण रसिकांच्या हातात विशेष काही पडत नाही. सध्याची अवस्था अशीच आहे का, याचा विचार करायला हवा. निखळ आणि उत्तम अभिजात साहित्यावर जे थोडेफार अंक चालू आहेत त्यांना आर्थिक संकटांमुळे घरघर लागली आहे. अर्थात यात काही निवडक सन्माननीय आणि वंदनीय अपवाद आहेत, नुसत्या तक्रारी करून उपयोग नसतो, म्हणून काही सकारात्मक उपाय सुचवतो.

1. मुख्य म्हणजे आपण वाचकांनी दिवाळीत केल्या जाणाऱया खर्चाचा काही टक्के भाग तरी दिवाळी अंकांवर आवर्जून करायला हवा. विकत घेऊन दिवाळी अंक वाचायला हवे.

2. जाहिराती आणि साहित्य यांचे कमाल प्रमाण निश्चत करावे त्यामुळे जाहिरातींचा बेसुमार मारा कमी होईल, त्या ऐवजी कंपन्यांनी पूर्ण अंक स्पॉन्सर करावेत. दिवाळी अंकांची
स्पॉन्सरशिप हा घटक कंपनी कायद्यात ‘सीएसआर’ च्या परिशिष्टात सामील करावा. (कंपन्यांना सी.एस.आर. म्हणून काही समाजोपयोगी खर्च करणे कंपनी कायद्यानुसार अनिवार्य आहे. त्यात हा मुद्दा समाविष्ट केला पाहिजे.)

3. संपादकीय कामात काही नियम कटाक्षाने पाळावे. जसे, एका लेखकाचे साहित्य सलग तीन वर्षाहून अधिक वर्षे न घेणे. किमान 25 टक्के साहित्य हे नव्या लेखकाचेच हवे.

4. लेखकांना देण्यात येणाऱया मानधनाचे किमान दर ठरवायला हवे. मानधनाशिवाय लेखन करणे लेखकांनीही कटाक्षाने टाळायला हवे.

5. फ्लिपकार्ट, ऍमेझॉन यांच्या मदतीने सर्वदूर वितरण आणि विपणन करून दिवाळी अंकांची विक्री मोठय़ा प्रमाणात वाढवायला हवी.

6. नामांकित म्हाताऱया लेखकांनी आवर्जून नवोदित दिवाळी अंकात लिहून त्यांना नाव मिळवून द्यायला हवे तर नामांकित दिवाळी अंकांनी कर्तव्यभावनेने नवनव्या लेखकांना स्थान देऊन प्रस्थापित होण्याची संधी द्यायला हवी.

सांगायचा मुद्दा, युद्धपातळीवर काही उपाय योजले नाहीत तर ‘दिवाळी अंक’ नावाचा हा एकेकाळचा संपन्न वारसा एक निरर्थक आणि बाजारू उपचारात रूपांतरित होईल आणि त्यासाठी गळे काढणारी पिढी जसजशी नष्ट होईल तसतसे नव्या बाजारू अंकांचे स्तोम माजेल आणि एके काळी दिवाळी अंक म्हणवल्या जाणाऱया श्रीमंत वाङ्मयीन घटनेचे सप्तरंगी थडगे बाजारात वाजत गाजत येत राहील. ते टाळणे तुमचे आमचे कर्तव्य आहे.

[email protected]