
सामना प्रतिनिधी । बीड
दिवाळीची धामधूम सुरू असताना बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईक या आनंदापासून दूर असतात. ही बाब ओळखून रुग्णांची दिवाळी गोड करण्यासाठी येथील पटेल फाऊंडेशनतर्फे मंगळवारी फराळाचे वाटप करण्यात आले. पहिल्यांदाच राबविलेल्या या उपक्रमाने रुग्ण अक्षरश: भारावून गेले होते.
‘पटेल फाऊंडेशन’चे अध्यक्ष शाहेद पटेल यांच्या संकल्पनेतून दिवाळीनिमित्त जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असेलल्या रुग्ण व त्यांचे नातेवाईक अशा एकूण ३०० जणांना फराळाचे वाटप करण्यात आले. रुग्ण व सोबत असलेल्या नातेवाईकांना ना फराळ मिळतो ना दिवाळीचा आनंद. त्यामुळे त्यांची दिवाळी आनंददायी करण्यासाठी हा सामाजिक उपक्रम घेण्यात आला. यावेळी पुरुष रुग्णांना टॉवेल, टोपी देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे, पेठ बीड ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे, शहर ठाण्याचे सहायक निरीक्षक नितीन पगार, ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, विजयराज बंब, ॲड. शेख शफीक, ॲड. विवेकानंद सानप, नाना जाधव, दादासाहेब मुंडे, खमर खान, सरपंच जुबेर पटेल, सरपंच मुकेश भोकरे, सरपंच सादेक पटेल, माजी सरपंच खाजाभाई पठाण, शेख शकील, फय्याज शेख व पत्रकार बाधंव यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले.
रुग्ण गहिवरले!
दिवाळीसारख्या मोठ्या सणामध्ये उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रहावे लागल्याने अनेकांना सणाचा आनंद घेता आला नव्हता. मात्र, पटेल फाऊंडेशनचे अध्यक्ष शाहेद पटेल हे रुग्णांसाठी धावून आले. त्यांनी फराळाचे वाटप करतानाच अस्थेवाईकपणे चौकशी करुन धीर दिला. त्यामुळे रुग्णांना गहिवरुन आले होते. हा उपक्रम प्रत्येक वर्षी राबविला जाणार असल्याची घोषणा शाहेद पटेल यांनी यावेळी केली.


























































