
सामना प्रतिनिधी । मुंबई
नालेसफाईसाठी पालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना काही बेजबाबदार रहिवासी पुनःपुन्हा नाल्यात कचरा टाकत असल्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी कचऱयाचे ढीग साचून पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे अशा ठिकाणी पालिका प्रशासनाने ‘नजर’ ठेवावी आणि वारंवार सांगूनही पुन्हा कचरा टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांचे पाणी कापावे असे सक्त निर्देश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले. नाल्यात कचरा टाकणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
पावसाळापूर्व नालेसफाई आणि मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आज महत्त्वपूर्ण बैठक घेतली. पालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मोठे नाले, छोटे नाले व रस्त्यालगतच्या गटारांची सफाईची कामे केली जातात, मात्र नाल्याभोवती वसलेल्या झोपडय़ा, निवासी संकुलांतून कचरा थेट नाल्यात टाकला जातो. त्यामुळे पाकसाळ्यापूर्वी नाल्यातील गाळ व कचरा काढल्यानंतरही कचऱ्याचे ढीग दिसून येतात. यामुळे पाणी तुंबण्याचे प्रकारही घडतात. पालिकेकर यामुळे टीका होते. हे टाळण्यासाठी आयुक्तांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. संबंधित कामे निर्धारित वेळापत्रकानुसारच गुणवत्तापूर्ण पद्धतीने करावीत असे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले. आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या मासिक आढावा बैठकीला अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, प्रवीण दराडे, आबासाहेब जऱ्हाड, अश्विनी जोशी, उपायुक्त रमेश पवार यांच्यासह पालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
अशी होणार कारवाई
पालिकेने झोपडपट्टी, निवासी संकुलांतून वाहणाऱया नाल्याच्या कडेला ‘जाळी’ व ‘फ्लोटिंग ब्रूम’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकांनी नाल्यात कचरा टाकू नये यासाठी जनजागृती करावी यासाठी स्थानिक नगरसेवकांची मदत घेणार.
वारंवार कचरा टाकला जात असल्यास प्रथम दंडात्मक कारकाई करावी. यासाठी मनुष्यबळाची नियुक्ती करावी अशा सूचना दिल्या आहेत. मात्र तरीही प्रतिसाद न मिळाल्यास संबंधित परिसरातील पाणीपुरवठा खंडित करावा.
तक्रारींसाठी 24 तास जीपीएस सिस्टीम
नागरिकांच्या तक्रारींची 24 तास नोंद घेण्यासाठी महापालिकेचे MCGM 24×7 अधिक व्यापक व लोकाभिमुख करण्यासाठी हे मॉडेल विकसित करावे असे निर्देशही आयुक्तांनी अधिकाऱयांना दिले. यामध्ये प्रत्येक तक्रारीसोबत तक्रारीशी संबंधित छायाचित्रे ‘अपलोड’ करण्याची सुविधा देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
…तर अधिकाऱयांवर कारवाई
नालेसफाई व रस्त्यांच्या पूर्ण झालेल्या कामांची 12 जून 2019 पर्यंत छायाचित्रे ‘अपलोड’ करावीत. या छायाचित्रांमध्ये व सदर ठिकाणी असलेल्या प्रत्यक्ष कामात तफावत जाणवल्यास नागरिकांना त्याबाबतची छायाचित्रे अपलोड करता येणार आहेत. मात्र नागरिकांनी अपलोड केलेल्या छायाचित्रांमध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित अधिकाऱयांकर पालिका सेवा नियमावलीनुसार कारकाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
पालिका क्षेत्रात 499 धोकादायक इमारती
पालिका क्षेत्रात सध्या 499 इमारती या ‘सी-1’ अर्थात अतिधोकादायक या वर्गवारीतील आहेत. सी-1 प्रवर्गामधील इमारतींना महापालिका अधिनियमाच्या कलम 354 नुसार नोटीस बजाकून व संबंधित प्रक्रियेनंतर इमारत पाडली जाणार आहे.
तर धोकादायक/मोडकळीस आलेल्या खासगी इमारतीतील रहिवाशांचे स्थलांतर पोलिसांच्या मदतीने करण्यात येणार असून पालिकेच्या मालकीच्या इमारतीमधील रहिवाशांची सदर इमारत पाडण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करावी असे निर्देश देतानाच पालिकेच्या कामात रहिवाशांनी अडथळा निर्माण केल्यास संबंधित इमारतीची विद्युत जोडणी व जलजोडणी खंडित करावी, असे निर्देशही आयुक्तांनी दिले.
न्यायप्रविष्ट प्रकरणात न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्यास इमारत कोसळून काही वित्तीय व जीवितहानी होऊ नये यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करून स्थगिती आदेश उठविण्याबाबत विनंती करण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचनाही विधी खात्याला आयुक्तांनी दिल्या आहेत.

























































