
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
शहरातील सुदेश टॉकीज, सावरकर चौक, धान्य मार्केट, बाजारतळ, गांधीनगर, टिळकनगर या वर्दळीच्या परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने बुधवारी सकाळी एका तासात जवळपास ११ नागरिकांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. मोकाट व भटक्या श्वानांची संख्या मोठी असून त्यांनी मांडलेला उच्छाद व टोळयांनी हल्ला करण्याची प्रवृत्तीमुळे निविदा काढुनही पालिकेला माणसे मिळेनात. तेव्हा पालिकेने बोली वाढविली आहे, असे मुख्याधिकारी यांनी सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरात मोकाट कुत्री, गायी, डुक्कर यासह मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट आहे. नागरिकांनी वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे.परंतू या संदर्भात पालिका प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळेच शहरात अश्या पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच अजूनही पालिका प्रशासनाकडून सदरची कुत्री पकडण्यासाठी कोणतीच हालचाल झाली नाही. यामध्ये सुशांत शंकर वाघमारे, वनिता दिपक पठारे, शैताण सिंग मांगालिया, रामेश्वर हरिकृष्ण शेटे, मोनिका रवी गवड, मिथुन शंकरराव परजने, नाना अशोक पेटारे, अमोल शरद शिंपी या आठ नागरिकांसह इतरही तिघांना कुत्र्याने चावा घेतला असून त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आला.यापैकी सुशांत शंकर वाघमारे, वनिता दिपक पठारे, शैताण सिंग मांगालिया या तीन रुग्णांना कुत्र्याने मोठ्या प्रमाणात चावा घेतल्याने पुढील २४ तासाच्या आतील उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसौदर यांनी दिली. तर तीन नागरिक बाहेरील रहिवासी असल्याने त्यांची नावे समजुशकली नाही.
शहरातील भटक्या मोकाट जनावरे पकडण्यासाठी दोन महिन्यात दोन वेळा जाहीर प्रकटन करून टेंडर काढले आहे. परंतु भटकी जनावरे पकडणारे कर्मचाऱ्यांना धोका असल्याने काम करत नाही. नव्याने पुन्हा त्यांना पैसे वाढवून भटकी कुत्री पकडण्याचे आदेश देण्यात आले आहे. – प्रशांत सरोदे मुख्याधिकारी





























































