
सामना ऑनलाईन, मुंबई
शीव येथील प्रतीक्षा नगरात आज पहाटेच्या अंधारात दोघा नशेबाज तरुणांनी युवा नावाच्या भटक्या कुत्रीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. भुंकते म्हणून दोघांनी लोखंडी रॉडने युवाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. यातच युवाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रतीक्षा नगरातल्या पंचशील नगरातील सेवा संघ येथे ती कुत्री राहत होती. तेथील मंडळाच्या तरुणांची ती खूप लाडकी होती. तिचा प्रत्येकाला लळा लागला होता. युवाचा प्रत्येकजण सांभाळ करायचे. 29 तारखेच्या मध्यरात्री अडीचच्या सुमारास युवा दोघा नशेबाज तरुणांवर भुंकली आणि इथेच घात झाला. त्या निर्दयी नशेबाजांनी लोखंडी रॉडने युवाला जबर मारहाण केली. या मारहाणीतच युवाने जीव सोडला. याप्रकरणी युवाचा सांभाळ करणारे श्याम धमाल, कृपा देवेंद्र, रमेश आदींनी वडाळा टीटी पोलीस ठाण्यात आरोपी तरुणांविरोधात तक्रार दिली आहे. युवा ही भटकी कुत्री होती पण तिने कधीच कोणाला कसला त्रास दिला नाही. आम्ही मंडळाचे सर्वजण तिचा सांभाळ करायचो. पण ज्या तरुणांनी तिला मारले ते नशेबाज होते. रात्री उशिरा रस्त्याने ये-जा करताना ते तिला चिडवायचे म्हणून ती भुंकायची. या घटनेपासून दोघेही फरार असल्याचे श्याम धमाल यांनी सांगितले.



























































