रेल्वे स्थानकाला बेकायदा रिक्षा स्टॅण्डचा विळखा

363

डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूककोंडी टाळावी यासाठी पालिकेने सुसज्ज वाहनतळ बांधले आहे. मात्र या वाहनतळात रिक्षा स्टॅण्डसाठी जागा द्यायची की नाही यावरून पालिका आणि वाहतूक पोलिसांमध्ये वाद आहे. या कादात दोन वर्षांपासून पाटकर प्लाझा वाहनतळ ओस पडले असून डोंबिवलीच्या ट्रफिकची पुरती वाट लागली आहे.

नेमका गोंधळ काय?

स्टेशन परिसरातील कोणते रिक्षा स्टॅण्ड हलवणार, किती रिक्षा तेथे उभ्या करण्यात येतील याचा सर्व्हे आरटीओ विभागाने करण्याची गरज आहे. वाहतूक विभागाने जबाबदारी घेतली तरच रिक्षा युनियनला जागेचा ताबा देऊ, असे सहायक आयुक्त प्रकाश ढोले यांनी सांगितले. यावर आमची जबाबदारी वाहतूक नियमन करण्याची असून वाहनतळाची जबाबदारी घ्यायचा प्रश्न येतो कुठे? असा सवाल वाहतूक पोलीस विभागाचे सतीश जाधव यांनी केला आहे. या गोंधळात वाहतूककोंडीत भर पडली आहे.

डोंबिवली स्थानक परिसरात वाहतुकीचा नेहमीच बोजवारा उडाला आहे. जागा मिळेल तिथे केले जाणारे वाहनाचे पार्किंग आणि नो एण्ट्रीमधून वाहनचालकांची घुसखोरी रोखताना वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने सुनीलनगर आणि पश्चिमेकडील सम्राट चौकात आरक्षित भूखंडावर भव्य वाहनतळ उभारले असले तरी ते स्थानकापासून लांब असल्यामुळे वाहनचालक त्याचा कापर करत नाहीत. आता रेल्वे स्थानकाला खेटून असलेल्या चिमणी गल्लीत पालिकेच्या आरक्षित भूखंडावर खासगी विकासकाने भव्य इमारत उभी केली असून या इमारतीचा तळमजला आणि पहिला मजला पार्किंगसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. विकासकाने पाटकर प्लाझा पार्किंगच्या इमारतीचे काम पूर्ण करून दोन वर्षांपूर्वी ही इमारत पालिका प्रशासनाकडे हस्तांतरित केली असली तरी अद्याप इमारतीचा वापर सुरू करण्यात आला नाही. यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच शहरातील वाहनाच्या पार्किंगला शिस्त उरलेली नाही. पालिकेच्या मालमत्ता विभागाने वाहतूक विभागाला पत्र पाठवून पाटकर प्लाझा वाहनतळाची जागा ताब्यात घेण्याची विनंती केली असली तरी वाहतूक विभाग त्याला उत्तर देत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या