
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी टिफनी आणि तिचे पती मायकल बाउलोस हे हिंदुस्थान दौऱ्यावर आले असून त्यांनी शनिवारी आग्रा येथील प्रसिद्ध ताजमहालला भेट दिली. दोघेही जवळपास एक तास या ठिकाणी होते. ताजमहालचे सौंदर्य पाहून टिफनी एकदम भारावून गेल्या. ताजमहालमध्ये जे संगमरवर वापरले आहेत, ते कुठून आणले आहेत? यावर इतकी सुंदर नक्षीकाम कसे केले आहे?, असे टिफनी यांनी मार्गदर्शक रमेश दिवाण यांना विचारले. यावर रमेश यांनी सांगितले की, संगमरवर कुठूनही आणले नाहीत. ते हिंदुस्थानाचेच आहेत. नक्षीकामात वापरलेल्या दगडांबद्दल सांगितले की, दगड भारताव्यतिरिक्त आफ्रिका, येमेन यांसारख्या देशांतून मागवले होते. टिफनी आणि मायकल यांनी यावेळी फोटोसेशनही केले.
























































