
कॅपिटॉल हिल येथील हिंसाचार प्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा महाभियोग मंजूर करण्यात आला आहे. या वेळी मांडण्यात आलेला प्रस्ताव 232 विरुद्ध 197 मतांनी प्रतिनिधीगृहात मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे ट्रम यांच्याच रिपब्लिकन पक्षाच्या दहा खासदारांनी या महाभियोग प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षांवर दोन वेळा महाभियोग चालविला जाणार आहे.
कॅपिटॉल हिल येथील अमेरिकन काँग्रेसच्या प्रतिनिधीगृहात घुसून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी भयंकर हिंसाचार केला होता. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. ट्रम्प यांच्या चिथावणीमुळेच हा हिंसाचार झाल्याचा आरोप आहे. यापूर्वी ट्रम्प यांच्यावर पहिल्यांदा महाभियोग आणण्यात आला. बुधवारी पुन्हा दुसरा महाभियोग आयोग मांडला गेला. हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आला तेव्हा 232 विरुद्ध 197 मतांनी मंजूर झाला आहे. आता 19 जानेवारीला सिनेटमध्ये हा प्रस्ताव येईल. त्यानंतर ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवून शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
हकालपट्टीचा ठराव मंजूर
महाभियोगपूर्वी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी 25व्या घटनादुरुस्तीनुसार ट्रम्प यांची हकालपट्टी करण्याचा ठराव मांडला. 223 विरुद्ध 205 मतांनी मंजूर झाला. त्यामुळे 20 जानेवारीपूर्वी ट्रम्प यांची हकालपट्टी होते का, हे पाहावे लागेल.
भविष्यात निवडणूक लढविण्यास बंदी घातली जाऊ शकते
20 जानेवारीला जो बायडन हे राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे घेतील. तत्पूर्वी ट्रम्प यांना हाकलले नाही तर 20 जानेवारीनंतरही त्यांच्यावर बायडन सरकारकडून महाभियोग चालविला जाईल. ट्रम्प यांना भविष्यात निवडणूक लढविण्यास बंदीची कारवाई महाभियोगाद्वारे होऊ शकते.




























































