तेलंगणात जाण्याचा विचारही करू नका…पालकमंत्री रामदास कदम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नांदेड

तेलंगणात जाण्याचा नाद सोडा, पालकमंत्री म्हणून तुमच्या भागासाठी जिल्हा नियोजन विकास मंडळाचा २५ टक्के निधी सर्व विकास कामासाठी खर्च करू, कालबध्द कार्यक्रमातंर्गत सर्व प्रश्न टप्प्याटप्प्यानें मार्गी लागतील, तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे ठोस आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी तेलंगणात जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सरपंचांना दिले. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी तसेच या भागाचे आमदार वसंतराव चव्हाण उपस्थित होते.

धर्माबाद व परिसरातील पाटोदा, शेळगाव, माष्टी, बाभळी, मनूर, संगम यासह अन्य गावांच्या नागरिकांनी व तेथील सरपंचांनी या भागात कुठल्याच सुविधा मिळत नसल्याने, शेतकऱ्यांची ओढाताण होत असल्याने, विकासाचे प्रश्न मार्गी लागत नसल्याने तेलंगणात जाण्याची इच्छा तेलंगणातील नेत्यांना भेटून व्यक्त केली होती. याला बऱ्याच सरपंचांचा पाठिंबा मिळत होता. ही बाब शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कानावर गेल्यानंतर व शिवसेना आमदार सुभाष साबणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पालकमंत्री रामदास कदम यांना यावर तातडीने प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारी मंत्रालयात पालकमंत्री रामदास कदम यांच्या दालनात एक सविस्तर बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रामुख्याने या बैठकीत धर्माबाद व परिसरातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्यानंतर पालकमंत्री रामदास कदम यांनी काळजी करु नका, तुम्हाला तेलंगणाची आठवणही येणार नाही, असे नियोजन करू, प्रलंबित असलेल्या सर्व कामांची यादी तयार करुन त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. एका विशिष्ट कालावधीत कालबध्द कार्यक्रमानुसार सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील, यासाठी जिल्हा नियोजन मंडळाचा २५ टक्के निधी खर्च करण्यात येईल, या भागात राहणाऱ्यां मराठी माणसाचे हे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करुन व त्यासाठी दर महिन्याला बैठका लावून हे प्रश्न सोडवून देऊ, तेलंगणाचा विचार आता सोडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. आमदार वसंतराव चव्हाण यांनी सदरची बैठक सकारात्मक झाल्याचे सांगून निश्चित या भागातील जनतेला न्याय मिळू शकेल, असे मत व्यक्त केले.