
>> डॉ. अनिल कुलकर्णी
सोविएत रशियन साहित्यिक युरी नगीबीन यांची डॉ. सुनीती देशपांडे यांनी अनुवाद केलेली ही कथा आहे. नगीबीन यांच्या कथांमध्ये पात्रांची गर्दी नसते, पण प्रत्येक पात्र स्वतंत्र रूपाने प्रभावी होऊन उभे राहते. लेखकासाठी लहान मूल आणि निसर्ग यांचे अतूट नाते खास लोभाचे वाटते.
एका छोटय़ाशा गावातील रशियन शिक्षिका शाळेत आल्यानंतर वाक्य आणि त्याचे घटक शिकवताना नाम कशाला म्हणायचं? असे विचारल्यावर मुलांनी अनेक नामांची उदाहरणे सांगितली, जसे विद्यार्थी, पुस्तक, मांजर इत्यादी. नेहमीच उशिरा येणाऱया मुलालाही विचारले. उशीर झालेल्या मुलाने नाम याचे उदाहरण सांगितले – शिशिरातील वृक्षराज!
शिक्षिकेने सांगितले, शिशिरातील का? शिशिरातील हे विशेषण अजून आपण शिकलो नाही. तू जरा मला सुट्टीत येऊन भेट. शिक्षिकेने विचारले, तू रोज उशिरा का येतो? त्याने सांगितले की मी घरातून लवकर निघतो, पण मला एवढय़ा अंतरासाठी एक तास लागतो. शिक्षिकेने सांगितले की, तुझ्या घरापासून पंधरा मिनिटांवर शाळा आहे. जास्तीत जास्त अर्धा तास लागू शकतो. तो म्हणाला की, ‘मी हमरस्त्याने नाही येत. पाऊलवाटेने, जंगलातून येतो.’ उशिरा येणाऱया मुलाच्या आईला शिक्षिकेने भेटायचे ठरवले. मुलाने हमरस्त्याने न जाता पायवाटेने जायचे ठरवले.जंगलाची वाट धरताच शुभ्र बर्फाच्या झुंबरांनी सजलेली झाडे पाहून शिक्षिकेला फार प्रसन्न वाटू लागले. ही शुभ्रता किती संकेतांचे प्रतीक असू शकते असे त्यांना वाटले .
आणखी थोडे पुढे गेल्यावर तर त्यांना एखाद्या परीकथेचा आभास होऊ लागला. पानापानावर, फांदीफांदीवर बर्फाचे तुरे डोलताना दिसू लागले. या डहाळीवरून त्या डहाळीवर हिंदोळे घेणारे पक्षीही पांढुरके दिसत होते. कुण्या चित्रकाराने आपला कुंचला अलगद फिरवून सारी वनराजी शिशिरशुभ्र करून टाकली होती. जवळूनच वाहणाऱया झऱयाचे अवखळ खळाळते पाणी आणि मखमली तुषार… जणू हितगुज करण्यासाठी बोलवीत होते. अंतरा अंतरावर नुसत्या बर्फाच्या शुभ्र शाली दिसत होत्या. वेगवेगळय़ा पोताच्या आणि डौलाच्याही. कुठेतरी झाडी विरळ होत राहायची आणि मग सूर्याची लखलखीत तिरीप पानापानातून जणू पाठशिवणीचा खेळ खेळत राहायची. शिक्षिकेला वाटले याला उगीच नसेल होत उशीर शाळेत यायला. कोणीही भुलून, वेडावून जावे असेच हे मंतरलेले जग आहे. इथे या जंगलातल्या गर्भागारात अशी नवलाई निसर्गाने जागोजागी पेरून ठेवली आहे. आपण फक्त पाहायचे आणि आश्चर्य करीत थकून जायचे. या प्रत्येक नवलाईचे रूपही वेगळे आणि आकर्षणही वेगळे.
पुढच्याच क्षणी त्यांनी पाहिले आणि समोर छाती ताठ करून एक वृक्षराज उभा होता. क्षणभर काळजाचा ठोका चुकल्यासारखा वाटला. हे एवढे भव्य सुंदर काय असावे? इतक्यात विद्यार्थ्याने सांगितले, “हाच तो ‘शिशिरातील वृक्षराज.’ मी तुम्हाला उदाहरण नव्हतं का सांगितलं नाम या व्याकरण प्रकाराचं.”
या मनोहारी स्वर्गीय वातावरणात तो वृक्षराज नुसताच भव्य नव्हता तर अनेक जीवमात्रांचा उदार आश्रयदाता होता. काहींना कुशीत विसावू देणारा, अंगाखांद्यावर खेळवणारा, निसर्गाच्या लहरी खेळापासून संरक्षण देणारा. शिक्षिकेने त्याचे हात हातात घेतले आणि आता तू रोज पाऊल वाटेने येऊ शकतोस असे सांगितले. त्यांना वाटले पराभव आपला झाला आहे. तो या चिमुकल्यानेच लक्षात आणून दिला आहे. काय हरकत आहे त्याची कबुली द्यायला? त्यांना त्यांचा तास आठवला आणि यापूर्वीचे कंटाळवाणे शिकवणही. भाषाही निसर्गाच्या सान्निध्यातच फुलारत, आकारत असते. तिला त्या तांत्रिक नियमात, व्याख्येत डांबून ठेवण्याची गरज काय? त्यांना मुलांची उत्तरे आठवली आणि या विद्यार्थ्याचे उत्तर ‘शिशिरातील वृक्षराज’ आठवले. त्यांनी विद्यार्थ्यासमोर त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या ‘तू रोज याच पाऊलवाटेने यायचे. आज तू माझ्यासमोर हा एवढा मोठा खजिना खुला केलास, एवढे काही मला शिकवलेस, कशी उतराई होऊ मी तुझी? सांगशील?’
त्या शिक्षिकेने शिक्षकी पेशातील फार मोलाचा धडा घेतला होता. तोही कोणा पंडिताकडून नाही तर या चिमुरडय़ा पोराकडून. त्याचा तो निसर्गाचा अभ्यास, त्याचे ते शोध आणि तो आत्मविश्वास त्यांना खूप काही शिकवून गेला होता. कशा रीतीने त्या त्याच्या उतराई होणार होत्या? आजच्या पिढीला निसर्गाच्या सान्निध्यात राहणे जमत नसल्याने ते एका दुर्मिळ आनंदापासून वंचित आहेत. मुलांना पालकांनी आणि शाळेने निसर्गाच्या सान्निध्यात नेले तर अनेक संबोध स्पष्ट व्हायला मदतच होणार आहे.
(संदर्भ : रशियन कथांचा भावानुवाद कथांतर डॉ. सुनीती देशपांडे)
[email protected]





























































