
सामना प्रतिनिधी । अंबाजोगाई
संपूर्ण महाराष्ट्राच भूषण येथील मानवलोक या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक कार्यवाह व जेष्ठ समाज सेवक डॉ. द्वारकादासजी लोहिया यांचे रात्री 10.45 वाजता येथील आशा आय सी यु सेंटर मध्ये दुःखद निधन झाले शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मानवलोक या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कृषी, जलसंधारण या क्षेत्रात काम करून देश विदेशात आपली ओळख निर्माण करणारे आणि ज्यांच्या नावाचा आजही प्रशासनात एक आदरयुक्त दरारा आहे. ज्यांच्या मुळे अंबाजोगाई तालुक्यातील हजारो वयोवृध्द, विधवा, परितक्त्या, अंध, अपंग, आशा वंचित घटकास आज शासनाच्या योजनेचा लाभ मिळतो आहे. प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करायचं झाल्यास ज्यांची हाक येताच आजही हजारो वयोवृध्द शहरातूनच नव्हे तर खेड्यापाड्यातून हातामध्ये काठी टेकवत येऊन रस्त्यावर उतरतात. तरुणाला लाजवेल असं ज्याचं सामाजिक क्षेत्रात कार्य आहे, असे जेष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादासजी लोहिया यांना प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या सुनबाई डॉ. शुभदा लोहिया यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्या नंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावत जाऊ लागली. औषध उपचारास ते कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने त्यांना पाच दिवसांपूर्वी येथील डॉ. नवनाथ घुगे यांच्या आशा आय सी यु सेंटर मध्ये उपचरार्थ हलवण्यात आले होते. त्यानंतरही त्यांच्या प्रकृती मध्ये कुठल्याची प्रकारची सुधारणा झाली नाही आणि रात्री 10.45 वाजण्याच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी रात्रीच रीघ लागली आहे.

































































