महाविकास आघाडीत असलो तरी सावरकरांचे विचार सोडले नाहीत, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेससोबत आम्ही महाविकास आघाडीत असलो तरी शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार सोडलेले नाहीत. एखाद्या मुद्दय़ावर मतभेद असणे आणि आघाडी म्हणून एकत्र राहणे या दोन्ही गोष्टी वेगवेगळय़ा आहेत, अशा शब्दांत शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱहे यांनी आज भाजपला ठणकावले.

भाजपने केलेल्या आरोपांचा डॉ. नीलम गोऱहे कडक शब्दांत पत्रकार परिषदेत समाचार घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळण्यासोबतच अनेक मुद्दय़ांवर शिवसेनेची स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे. असे असूनही अत्यंत हीन पद्धतीचे आरोप भाजपकडून होत आहेत. आशीष शेलार यांनी निराधार विधान केले आहे. आशीष शेलार यांचा सुरू असलेला ‘जागर’ नसून कांगावा आहे. जोवर एखादी व्यक्ती शिवसेनेवर टीका करत नाही तोवर पक्षात बढती मिळत नाही म्हणून आशीष शेलार टीका करत आहेत. त्यांना मंत्रिमंडळात घेतले जात नाही, त्यांना फक्त मुंबई अध्यक्ष केले. त्यामुळे अशी विधाने करीत आहेत, अशा शब्दांत आशीष शेलार यांच्यावर टीका केली. वसईच्या श्रद्धा वालकरच्या केसबाबत मी लवकरच राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटणार आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांना मदत व्हावी या उद्देशाने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची यासाठी नियुक्ती करावी अशी शिफारस करणार असल्याचे त्या म्हणाल्या.