
सोलापूर महापालिका सफाई कर्मचाऱयांकडून जीव धोक्यात घालून सुरक्षा साहित्यविना ड्रेनेज चेंबरमध्ये उतरून स्वच्छतेचे काम करण्यात येत आहे. यामुळे सफाई कर्मचाऱयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे महापालिका वरिष्ठ अधिकाऱयांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या या जीवघेण्या कामकाज पद्धतीबाबत संताप व्यक्त होत आहे.
यापूर्वी सोलापूर शहरात ड्रेनेजमध्ये उतरून काम करीत असताना गुदमरून सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असतानाही याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी मानल्या जाणाऱया सोलापूर शहरात महापालिकेचे सफाई कामगार सुरक्षा साहित्याविना काम करीत असल्याचे दिसून येत आहे. सफाई कर्मचारी महापालिकेचे असो अथवा कंत्राट पद्धतीवर असो त्यांना नियमानुसार सुरक्षा साहित्य देण्याची जबाबदारी महापालिका किंवा कंत्राटदारांची आहे.
पाणीवेस तालीम ते लक्ष्मी भाजीमंडई या मार्गाकर जवळपास दहा ते बारा फूट खोल ड्रेनेज चेंबरमध्ये उतरून दोन कर्मचारी काम करीत होते. त्यांच्याकडे कोणतेही सुरक्षा साहित्य दिसून आले नाही, ही गंभीर बाब आहे. यापूर्वी झालेल्या सफाई कर्मचाऱयांच्या मृत्यूच्या घटनांमधून महापालिकेने कोणताही धडा घेतला नाही. दरम्यान, या सफाई कामगारांना सुरक्षा साहित्य का दिले नाही, यासंदर्भात विचारणा केली असता तेथील निगराणी करणाऱया अधिकाऱयांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सुरक्षा साहित्याविना काम करून घेऊन या कर्मचाऱयांच्या बळीची वाट पाहत आहे का, असाच सवाल उपस्थित होत आहे. कोणत्याही सुविधा नसताना पोटापाण्यासाठी आजही जीवावर उदार होऊन असे अनेक सफाई कर्मचारी काम करीत असल्याचे विदारक चित्र शहरात आहे.
सोलापूर महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार हे नामानिराळे राहत असून, यात कर्मचाऱयांचा बळी जातो. वारंवार घडणाऱया अशा घटना रोखण्यासाठी महापालिका ठोस कार्यवाही करीत नाही. कर्मचाऱयांना सुरक्षा साधनेही देत नसल्याने महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवरच संताप व्यक्त होत आहे. पाणीवेस तालीम ते राणी लक्ष्मी भाजीमंडई या मार्गावर ड्रेनेज चेंबरमध्ये उतरून सुरक्षा साहित्याविना कामगार काम करीत होते. त्या कामगारांना का साहित्य दिले नाही, असे विचारणा करणाऱया ग्रामस्थाला कनिष्ठ अभियंत्याने उद्धट व अरेरावीची भाषा केली. महापालिका आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर कारकाई करण्याची मागणी होत आहे. तसेच सफाई कामगारांना आवश्यक ते सुरक्षा साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्याची गरज वर्तविली जात आहे.
बेजबाबदार अधिकाऱयांवर कारवाई करा
सफाई कामगार कामावर असताना सुरक्षा साहित्य वापरतो की नाही, या कामगारांना ऑक्सिजन मास्क, हॅण्डग्लोज यांसह इतर सुरक्षा साहित्य देण्यात आले की नाही, याकडे महापालिकेचे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, सार्वजनिक आरोग्य कार्यकारी अभियंता यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱयांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. दुर्लक्ष करणाऱया बेजबाबदार अधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.






























































