
सामना ऑनलाईन, मालवण
मालवण शहरात अंमली पदार्थांचे रॅकेट सक्रिय झाल्याच्या बातम्यांनी पोलिसांची झोप उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशीचा फास आवळला असून त्यांनी काही तरूणांची चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असल्याचं सांगण्यात आले आहे.
ज्या युवकांची चौकशी करण्यात आली त्यांनी बाहेरून मालवणात तस्करी केली जात असल्याचे सांगितले. हे तस्कर कोण आहेत शोधून त्यांना रोखणं पोलिसांसमोरील मोठं आव्हान आहे.
मालवण पोलीस ठाण्यात आपला मुलगा अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याची तक्रार काही पालकांनी केली होती. या मुलांना तुम्ही समज द्या असं या पालकांनी पोलिसांना सांगितलं. यामुळे पोलिसांनी या तरूणांची चौकशी केली होती.
पाळेमुळे खणून काढणार
पोलीस निरीक्षक चौधरी यांच्याकडून माहिती घेतली असता, मालवण शहरात अंमली पदार्थ येत असल्याची शक्यता नाकारता येत नाही असे स्पष्ट करण्यात आले. या तस्करांना रोखण्यासाठी
विशेष पोलीस पथक नियुक्त करण्यात आले आल्याचं चौधरी यांनी सांगितले आहे. हे तपास पथक दिवस रात्र तस्करांना शोधण्याच्या कामात गुंतले असून या ड्रग्ज तस्करांची पाळेमुळे खणून काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.






























































