दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीची डोक्यात पहार घालून हत्या, पतीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनोज पोटे । जयसिंगपूर

जैनापूर येथे दारू पिण्यासाठी घराबाहेर सोडत नाहीत व दारू पिण्यासाठी पैसे दिले नसल्याच्या कारणावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी पहारीने वार करून खून केल्याची घटना घडली. पद्मजा महावीर चौगुले (28) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती महावीर ऊर्फ दादा बापू चौगुले (35) याला पोलिसांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महावीर याला दारूचे व्यसचे होते. त्यामुळे पती पत्नीमध्ये वारंवार वाद होत असे. गेल्या काही दिवसांपासून पद्मजा महावीर याला दारू पिण्यासाठी घरातून बाहेर जावू देत नव्हती. यावरून मंगळवारी सकाळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. ‘तु मला घराचे बाहेर जाऊ देत नाहीस, मला दारू पिण्यासाठी पैसेही देत नाहीस, असे म्हणत महावीर याने पद्माजा हिच्या डोक्यावर, पाठीवर लोखंडी पहारीने वार केले. यामध्ये पद्मजा ही गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी सांगली येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसात सासू शोभा सुरगोंडा पाटील यांनी फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी आरोपी महावीर चौगुले याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सपोनि शहाजी निकम करीत आहेत.