
सांताक्रुझ येथील ग्रॅण्ट हयात हॉटेलमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन करणाऱ्याला वाकोला पोलिसांनी अटक केली. सूरज जाधव असे त्याचे नाव आहे. त्याने दारूच्या नशेत हा फोन केल्याचे उघड झाले. काही महिन्यांपूर्वी जाधवने मुंबई विद्यापीठातदेखील बॉम्बस्फोट करण्याचा निनावी फोन केला होता.
गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षात एक फोन आला. सांताक्रुझ येथील ग्रॅण्ट हयात हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक प्रदीप मोरे आणि पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना जाधवची माहिती मिळाली. त्याला वाकोला कोलावरी गाव येथून ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने बॉम्बच्या अफवेचा फोन केल्याची कबुली दिली.




























































