‘दूधगंगा’च्या ठेवीदारांचे उपोषण; आंदोलन सुरू, आरोपींना अटक आणि ठेवी परत देण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दूधगंगा नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांचा संयम अखेर सुटला आहे. घोटाळेबाज भाऊसाहेब कुटे याच्यासह फरार आरोपींना अटक करा, ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात, या मागण्यांसाठी आजपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश व उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत 81 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या नातेवाईक आणि अन्य काहीजणांनी हा अपहार केला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चेअरमन व राजकीय प्रतिष्ठत असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह तब्बल 21 जणांविरोधात विविध कलमांअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काही आरोपी अटकेत असून, काहीजणांना जामीन मंजूर झाला आहे. यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. गुन्हा दाखल होऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटत आला असला, तरी तपास यंत्रणा आरोपींपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे दूधगंगा नागरी पतसंस्था ठेवीदार संघर्ष समितीने आजपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश व उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात जवळपास 200 ठेवीदार सहभागी झाले आहेत.