कोळसा खाणीमधून घातक रासायनिक द्रव्य सोडल्यामुळे पिकं उध्वस्त, शेतकरी चिंतेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड या सरकारी कोळसा खाणी मधून घातक रासायनिक द्रव्य सोडल्यामुळे शेतकऱ्यांची पिकं उध्वस्त झाल्याचा प्रकार समोर आलाय. चंद्रपूर शहरालगत असलेल्या नांदगाव पोडे या गावातील ही घटना असून जवळपास 40 ते 50 हेक्टर शेत जमिनीतील पिकं उध्वस्त झाली आहे.

या भागात प्रामुख्याने उन्हाळी धान आणि भाजीपाला पिकं घेतली जातात. मात्र गावाजवळ असलेल्या वेकोलिच्या कोळसा खाणीतून दूषित पाणी या भागात सोडण्यात येत आहे. या घातक रासायनिक पाण्यामुळे शेतातील पिकं आणि संपूर्ण शेतजमिन प्रदूषित तर होतच आहे पण शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वचारोग होत असल्याचा आरोप देखील स्थानिकांनी केलाय. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन वेकोलीचे मुख्य प्रबंधक, उपमुख्य प्रबंधक यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी संजीवनी पर्यावरणाचे अध्यक्ष राजेश बेल यांनी केली आहे.