नशेबाजांना ‘बत्ती चरस’चा दम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाची सुरू असलेली धडक कारवाई, पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला यामुळे म्हणावा तितका चरसचा साठा शहरात येत नसल्याने त्याचा ड्रग्जमाफिया फायदा उचलत आहेत. हे माफिया मिक्सिंग केलेला ‘बत्ती चरस’ अडीच हजार रुपये तोळा अशा किमतीने नशेबाजांना विकत आहेत.

मुंबई शहरात ‘कश्मिरी चरसचा सर्वाधिक दम मारला जातो, पण अलीकडच्या काळात कश्मिरी चरस म्हणावा तितक्या प्रमाणात येत नसल्याने चरसमाफियांची अडचण झाली होती. कश्मिरी चरस साडेतीन हजार रुपये तोळा अशा किमतीत विकला जातो. पण चरसमाफियांनी यावर उपाय शोधला असून नशेबाजांना बत्ती चरस विकला जात आहे. कोळशाची पावडर, गांजा, मस्का आणि तेल यांचे मिश्रण करून ते ‘बत्ती चरस’ म्हणून सध्या विकले जात आहे. ओरिजिनल चरस मिळत नसल्याने चरसींना देखील मिळतोय त्या चरसवर दम मारावा लागत आहे.

  • 2017 मध्ये अमली पदार्थविरोधी पथकाच्या वरळी युनिटने कश्मिरी चरसचा मोठा माफिया हाजी अब्दुल रेहमान अली मोहंमद हकिम (67) याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर कश्मीरवरून चरसचा साठा मुंबईत आणणाऱ्या माफियांची साखळी तोडून टाकली.
  • 2017 मध्ये मुंबईत दोन कोटी 10 लाख 58 हजार रुपयांचा चरसचा साठा पकडला होता तर 2018 मध्ये 31 लाख 24 हजार 800 रुपयांचा चरसचा साठा पकडण्यात आला होता.
  • आता थेट मुंबईत चरसचा साठा आणण्यात येत नाही तर अहमदाबाद येथे चरस आणला जातो. त्यानंतर तेथून एक-दोन किलो अशा प्रमाणात त्याचे इतरत्र वाटप करण्यात येते असे पोलिसांकडून सांगण्यात आले.