Cricket World Cup सामना माणसांशी आहे, देवाशी नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

हिंदुस्थानी संघाला पहिला पेपर बऱयापैकी सोपा गेला. पुढचे प्रत्येक पेपर इतके सोपे असतील असं नाही.ओव्हलवर आज आपण ऑस्ट्रेलियाला भिडणार. आजपर्यंत आपल्याबाबतीत या विश्वचषकात काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. उदा. जसप्रीत बुमराहचा फॉर्म अर्जुनाच्या भात्यासारखा अमाप आहे.

चहलला लय सापडलीय. लेगस्पिनर मनगटाने चेंडू वळवत असल्यामुळे काही वेळा चेंडूच्या टप्प्यावर नियंत्रण राहत नाही. पण चहलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकही फुलटॉस किंवा आखूड टप्प्याच्या चेंडूची खिरापत दिली नाही. दिशाही अचूक ठेवली. त्यामुळे फलंदाजाला धावा काढण्यासाठी जोखीम घ्यायला लागली, त्यात दोघे फसले.

रोहित शर्माने शतक ठोकलं ही बातमी नाहीये, तो अत्यंत जबाबदारीने खेळला ही बातमी आहे. कॉलेजमध्ये कॅलोनाव्हा असलेल्या मुलाने लग्नानंतर एका बायकोबरोबर जबाबदारीने संसार सुरू करावा तसा त्याच्या बॅटने संसार सुरू केलाय असं वाटलं तरी खरं!

पण काही धोकादायक गोष्टीही घडल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क फॉर्मात आलाय. मुख्य म्हणजे तो फिट आहे. आयपीएलने वॉर्नरच्या फॉर्मला झोपेतून उठवलंय. धडपडणाऱया स्मिथला वेस्ट इंडीजच्या मॅचने आत्मविश्वास दिलाय. आणि पाऊस लंडन ओलं करतोय.

अस्मानीच्या सुलतानीपुढे माणूस थिटा ठरतो. पण इतर गोष्टींसाठी आपण तयारी करायला हवी. ऑस्ट्रेलिया हा संघ दबावाखाली प्रिंगसारखा उसळतो. वेस्ट इंडीज – ऑस्ट्रेलिया मॅचचा विचार करा. कुठे 5 बाद 79 आणि कुठे 288 धावांचे वॉर्नर, फिंच, ख्वाजा, मॅक्सवेल, स्टॉईनिस बाद झालेले. धावफलकाचा चेहरा किती रडका असेल विचार करा. त्यात स्मिथ अंधारातून प्रकाश शोधणाऱया माणसासारखा धडपडत होता. अचानक ऑस्ट्रेलियासाठी नॅथन कुल्टर नाईल प्रखर प्रकाश बनून आला आणि अंधाराचं जाळं फिटलं. ऑस्ट्रेलियाचं आकाश मोकळं झालं. हा कुणीही धुरंदर फलंदाज नव्हता. त्याने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 धावांचा पल्ला ओलांडलेला नव्हता. कुठल्याही व्यावसायिक स्पर्धेत त्याची सर्वोच्च खेळी 64 धावांच्या पलीकडे गेलेली नव्हती. त्याने तब्बल 92 धावा केल्या आणि त्यासाठी त्याला फक्त 60 चेंडू बस झाले. 8 चौकार आणि 4 षटकारांची सजावट होती त्याला! पराभवाच्या कराल दाढेतून असं काही खेचून काढण्याची ताकद ऑस्ट्रेलियात आहे. म्हणून आस्ट्रेलियाला कधीही कमी लेखता येत नाही. ही कथा इथेच संपत नाही. वेस्ट इंडीजला शेवटी 37 चेंडूंत 27 धावा हव्या होत्या. बेथवेट आणि होल्डरची युती भरभराट पाहत होती. ज्या कुल्टर नाईलने 92 धावा ठोकल्या त्याने 70 धावा स्वहस्ते दिल्या होत्या. त्यावेळी स्टार्क अवतरला. हरायची भीती त्याच्या डोक्यात नव्हती. जिंकायची जिद्द मनात होती. त्याने एक स्लोअर चेंडू, एक बाऊन्सर आणि एका यॉर्करवर मॅच संपवली. मुख्य म्हणजे चेंडू रिव्हर्स स्विंग केला. दोन टोकाकडून नवा चेंडू वापरात येत असल्यामुळे वन डेतून रिव्हर्स स्विंग जवळपास हद्दपार झालाय, पण स्टार्कने त्याला वश केलं. हाणामारीच्या षटकातल्या शेवटच्या दोन षटकांत त्याने दोन धावा देऊन तीन बळी घेतले. हा स्टार्क हिंदुस्थानसाठी खतरनाक ठरू शकतो.

त्यामुळे स्टार्कची गोलंदाजी हा आपल्या संघाच्या टीम मीटिंगचा महत्त्वाचा विषय असेल. जे बुमराहकडे आहे ते त्याच्याकडे आहे आणि तो डावखुरा आहे. त्यामुळे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी जास्त खतरनाक. त्यात ओव्हलच्या खेळपट्टीला स्पॉन्जी बाऊन्स आहे. टेनिस बॉलसारखा चेंडू उसळतो, पण हळू उसळतो. असा बाऊन्स ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ांवर असतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांना त्याची सवय आहे. मी नकारात्मक सूर आळवत नाहीए, पण धोके जाणून घ्यायला हवेत आणि आपली तयारी हवी. सरावाच्या पहिल्या सामन्यात स्टार्कप्रमाणेच, पण कमी वेगात गोलंदाजी टाकणाऱया न्यूझीलंडच्या बोल्टने हिंदुस्थानी फलंदाजांना त्रास दिला होता. त्यामुळे ही काळजी वाटते. स्टार्कची पहिली षटकं नीट सांभाळून खेळायला हवीत. विशेषतः रोहित शर्माने. पन्नास षटकांच्या सामन्यात सेट व्हायला वेळ मिळतो. एखाद्या गोलंदाजाला आदर दाखवून, अनादर इतरत्र दाखवता येतो. त्यात शहाणपण असते. रोहित काय किंवा विराट काय त्यांना एकदा सेट झाल्यावर मागे पडलेला स्ट्राईक रेट भरून काढता येतो. शेवटच्या दहा षटकांत, विशेषतः शेवटच्या पाच षटकांत वरच्या फळीतला एकतरी सेट फलंदाज असावा. नाहीतर स्टार्कला आपला तळ कापून काढणे सोपे जाईल.

डेव्हिड वॉर्नरला रोखण्याची जबाबदारी बुमराहने घ्यावी. त्याची ऍक्शन, त्याचा डावखुऱया फलंदाजांना बाहेर जाणारा चेंडू यॉर्कर आणि बाऊन्सर वॉर्नरच्या पायात बेडय़ा ठोकू शकतात. पहिल्या सामन्यानंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये विराट कोहलीने सांगितलं, ‘बुमराहला नेटमध्ये नीट खेळून बाहेर आल्यावर खूप आत्मविश्वास वाढतो.’ खरंय ते. तो आत्मविश्वास आपल्याला स्टार्क विरुद्ध उपयोगी पडला पाहिजे. ऑस्ट्रेलियन फलंदाजी तळापर्यंत आहे. किंबहुना ज्याला आपण तळ समजतो तो तळ नाहीय. हे कुल्टर नाईलने दाखवून दिलंय. त्यामुळे आपल्या गोलंदाजांची जबाबदारी मोठी आहे.

मला खात्री आहे, साऊदम्प्टनमधून निघताना हिंदुस्थानी संघाने कपडय़ात काही किटबरोबर आत्मविश्वाससुद्धा बॅगेत पॅक केला असेल. ओव्हलवर ते निळे कपडे अंगावर चढवताना आत्मविश्वासाने मन आणि ऊर भरून घेतला पाहिजे.

एक लक्षात ठेवावं, सामना माणसांशी आहे, देवांशी नाही. माणसांना हरवता येतं आणि त्यांना अलीकडे आपण अनेकदा हरवलंय.

– [email protected]