दोन्ही शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवत झाले; सुप्रिया सुळे यांचा भुजबळांवर पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गट यांच्याच विविध मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोपांचा फैरी झडत आहेत. तसेच पक्ष आणि चिन्ह यावरूनही त्यांच्यातील संघर्ष वाढला आहे. त्याचवेळी मंत्री छगन भुजबळ यांनी एका मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात अनेक विधाने केली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी भुजबळांवरच पलटवार केला आहे. भुजबळांची विधाने परस्परविरोधी असून दोन्ही शपथविधी शरद पवार यांना अंधारात ठेवत झाल्याचे त्यांनीच मान्य केले, असा पलटवार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

शरद पवार भाजपसोबत जाणार नव्हते. मी राजीनामा देऊन सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीच्या अध्यक्ष बनवतो त्यानंतर तुम्हाला हव ते करा, असे शरद पवार यांनी सांगितले होते, असा दावा भुजबळ यांनी केला. यावरही खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पत्रकार परिषद घेत सुप्रिया सुळे यांनी भुजबळांचे सर्व दावे खोडून काढले. त्या म्हणाल्या की, हे सर्वजण सारखे भाजपसोबत जायचे म्हणत होते, तेव्हा पवार साहेब दुखावले होते. म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर राज्यातून अनेकांनी पवार यांना विनंती केली. तर दुसरीकडे व्यासपीठावर छगन भुजबळ म्हणाले होते, की कमिटी वैगरे काही नको, आम्हाला शरद पवारच अध्यक्ष हवेत. एका बाजूला हे म्हणतात पवार साहेब हुकूमशाही करतात आणि दुसरीकडे तेच अध्यक्ष हवेत म्हणतात हा विरोधाभास दिसतो, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

भुजबळ एका मुलाखतीत चारवेळा म्हणाले, पवार साहेब आम्हाला म्हणाले होते मी तुमच्यासोबत भाजपसोबत येणार नाही, तुम्हाला जायचे असेल तर जाऊ शकता. सातत्याने पवार साहेब असे म्हणाले होते. पहाटेचा शपथविधी आणि 2 जुलैचा शपथविधी शरद पवारांना माहिती नव्हता, त्यांना अंधारात ठेऊन हा निर्णय घेण्यात आला. हे भुजबळ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी भुजबळांवर पलटवार केला.