संगमेश्वरात पुन्हा भूकंप; भूकंपाचे केंद्रबिंदू कर्दे, महिनाभरात दुसरा धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यात रविवारी मध्यरात्री 2 वाजून 36  मिनिटे आणि 20 सेकंदाला 4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. गेल्या महिनाभरात भूकंपाचा हा दुसरा धक्का आहे.

भूकंपाचे केंद्रबिंदू संगमेश्वरजवळच्या तिवरे घेरा प्रचितगडच्या पूर्वेला कर्दे या ठिकाणी असल्याचे सांगण्यात आले. झोन-4 मध्ये तालुक्याचा काही भाग येत असून यामध्ये चिपळूण, गुहागर, दापोली, मंडणगड या तालुक्यांचा समावेश होतो. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गेले दोन दिवस संगमेश्वर तालुक्यातील वातावरण ढगाळ आहे. रविवारी दुपारच्या दरम्यान जोरदार अवकाळी पाऊस पडला होता. यातच रविवारी मध्यरात्री सुमारे चार रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. याअगोदर 24 ऑक्टोबर रोजी वाशीतर्फे संगमेश्वर येथील सुतारवाडी जमिनीपासून पाच किलोमीटर अंतरावर भूकंपाचा धक्का बसला होता. त्या वेळी आजूबाजूला कोयना, पाटण, पोफळी या भागांतही भूकंपाचे धक्के जाणवले होते.