मुंबईला संसर्गजन्य आजारांसह बुडण्याची भीती! वातावरणातील बदलाचे भयावह परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीसीसीने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार पृथ्वीचे तापमान 1.1 अंश सेल्सिअसने वाढले आहे. त्यामुळे वारंवार चक्रीवादळे, भूस्खलन, अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्या आहेत. यापुढे उपाय न योजल्यास पृथ्वीचे तापामान 4-5 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलाचे परिणाम अत्यंत भयावह असून मुंबईची किनारपट्टी पाण्याखाली जाण्याची भीती आहे. त्याशिवाय कोविडसारख्या संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संयुक्त राष्ट्राच्या संस्थेने वातावरणीय बदलाच्या संदर्भात सादर केलेल्या अहवालातील सादरीकरणात मुंबईसह महाराष्ट्रामध्ये या वातावरण बदलाचे किती गंभीर परिणाम होतील लक्षात घेऊन पर्यावरणाचा ऱहास रोखण्यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने पुढाकार घेतला आहे. या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे-

मुंबईला धोका

मुंबई आतापर्यंत सुरक्षित बंदर म्हणून ओळखले जात होते. पण शहराने 2020मध्ये ‘निसर्ग’ व 2021मध्ये ‘तौक्ते’ ही दोन उष्णकटिबंधीय चक्रीवादळे अनुभवल्याचे अहवालात नमूद केले आहे.

अतिवृष्टीच्या वाढत्या घटना

मुंबई, महाराष्ट्र, युरोप, चीनमध्ये अतिवृष्टीच्या घटना वाढल्या. वातावरणातील बदलामुळे पावसांच्या दिवसांची संख्या घटली, पावासाचे आगमन व परतीच्या पावसाच्या वेळा अनिश्चित, ठरावीक प्रदेशात पावसाचे प्रमाण अधिक, पावसाच्या दिवसांमधील वाढलेले अंतर

वातावरणीय बदलाचे महाराष्ट्रावरील परिणाम

  • महासागराच्या तापमानात आणि समुद्राच्या पातळीत वाढ
  • वादळ व चक्रीवादळामध्ये वाढ
  • अतिवृष्टी, किनारपट्टी पाण्याखाली जाण्याची शक्यता
  • भूस्खलन
  • ओले क्षेत्र अधिक ओले
  • कोरडे भाग अधिक कोरडे
  • नागरी भागात उष्णता बेटे
  • उष्णतेच्या लाटा
  • उष्णतेचा शेती व जंगलांवर परिणाम
  • झुनेटिक आजाराचा प्रसार
  • गेट वे ऑफ इंडिया पाण्याखाली जाण्याची शक्यता
  • किनारपट्टी पाण्याखाली जाण्याचा धोका असलेल्या देशातील बारा शहरांमध्ये मुंबईचा समावेश
  • नागरीकरणाच्या वेगाचा परिणाम
  • काँक्रीटीकरण
  • पाणथळ जागांचा नाश
  • कांदळवनाचा ऱहास
  • वनस्पतींचे नुकसान

कोविड शेवटचा आजार नाही

2019 मध्ये जगाने कोरोना विषाणूमुळे कोविड-19 महामारी पाहिली. वातावरण बदलाच्या परिणामांमुळे निर्माण झालेला कोविड-19 हा शेवटचा साथीचा आजार नाही असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. या शतकाच्या पहिल्या 19 वर्षांमध्ये संसर्गजन्य विषाणूचा उद्रेक दिसून आला. सार्स, झिका, एचवन एनवन, इबोलाचा उद्रेक झाला होता.

किनारपट्टीला धोका आणि वणवे

िमहाराष्ट्र हा उष्ण कटिबंध प्रदेशात येतो. वातावरणात 2 ते 2.5 अंश सेल्सिअस तापमान वाढ झाल्यास राज्यातील सागर किनारपट्टी पाण्याखाली बुडण्याची तसेच मध्य महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ व जंगलांमध्ये वणवे लागण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आयपीसीसीच्या अहवालात हिंदुस्थानातील 12 शहरांतील सागरी किनारपट्टी पाण्याखाली जाण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे.