तुम्हाला फ्रेंच फ्राईज खायला आवडतात, ‘हे’ गंभीर आजार होऊ शकतात; संशोधकांचा नवा शोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फ्रेंच फ्राईजचे नाव घेतले तरी फक्त लहानांच्याच नाही, तर मोठ्यांच्याही तोंडाला पाणी सुटते. गेल्या काही वर्षांपासून फ्रेंच फ्राईज हे फास्ट फूड आपल्याकडे बरेच लोकप्रिय झाले आहे. मुलं तर हा पदार्थ अत्यंत आवडीने खातात. स्ट्रिट फूड म्हणूनही या डिशला पसंती आहे. अनेकदा रेस्टॉरंटमध्येही लोकं ते खाताना दिसतात, मात्र तुम्हाला हे माहित आहे का, जिभेची चटक भागवणारे हे फ्रेंच फ्राईज आरोग्यासाठी मात्र चांगले नसतात. याच्या अतिसेवनामुळे चिंता आणि नैराश्यदेखील येऊ शकते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही बाब उघडकीस आली आहे.

शारीरिकदृष्ट्या फ्रेंच फ्राईज हे अस्वास्थ्यकर मानले जात असले, तरी त्याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. wionews.com च्या बातमीनुसार, तळलेले अन्न, विशेषतः तळलेले बटाटे, चिंता आणि नैराश्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवतात.

फ्रेंच फ्राईज विशेषतः तळलेले बटाटे फास्ट फूड म्हणून तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. फ्रेंच फ्राईज एकाच वेळी भरपूर खाल्ले जातात. यावर शास्त्रज्ञांनी नुकतेच केलेले एक संशोधन अत्यंत धक्कादायक आहे. चीनमध्ये करण्यात आलेले हे संशोधन प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (पीएनएएस) मध्ये प्रकाशित झाले आहे. यामध्ये असे आढळले आहे की, तळलेले अन्नपदार्थ, विशेषतः तळलेल्या बटाट्यांचे वारंवार सेवन केल्याने नैराश्य आणि चिंता होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो.

संशोधनात असे आढळून आले की, जे लोक सतत तळलेले अन्न खात होते, त्यांना चिंताग्रस्त समस्या तळलेले अन्न न खाणाऱ्या लोकांपेक्षा 12 टक्के जास्त आढळल्या. त्याच वेळी, नैराश्यदेखील 7 टक्के अधिक आढळले. तरुण ग्राहकांमध्ये हा दुवा अधिक स्पष्टपणे दिसत होता.

तळलेल्या पदार्थांचा मानसिक आरोग्यावर परिणाम
तज्ज्ञांच्या मते, हे संशोधन सुरुवातीच्या टप्प्यात आहे, पण तळलेले पदार्थ मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात हे स्पष्ट झाले आहे. अभ्यासादरम्यान, 1,40, 728 लोकांचा समावेश करण्यात आला. या विषयावर 11 वर्षे आणि 3 महिन्यांसाठी केले गेले. सुरुवातीच्या दोन वर्षांच्या अभ्यासानंतर नैराश्याचे निदान झालेल्या सहभागींना काढून टाकल्यानंतर, एकूण 8,294 चिंतेची प्रकरणे आणि 12,735 नैराश्याची प्रकरणे आढळून आली. अभ्यासात असेही आढळून आले की, तरुण मुले नियमितपणे तळलेले अन्नपदार्थ जास्त प्रमाणात ग्रहण करतात. याआधी ‘फूड अँड मूड: हाऊ डू डाएट अँड न्यूट्रिशन इफेक्ट मानसिक आरोग्य’ या अभ्यासात असे आढळून आले की, निकृष्ट पोषणामुळे नैराश्यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.