
एकनाथ शिंदे यांच्यावरील विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने सभागृहात शेरोशायरी, राजकीय कुरघोडी, राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत करण्याच्या तंत्राची चर्चा आणि मातृप्रेमाचीही प्रचीती पाहायला मिळाली. तसेच साम दाम दंड भेदऐवजी आता ईडी आणि इन्कम टॅक्सची नीती असल्याची चर्चा होती.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱया दिवशी एकनाथ शिंदे यांच्यावरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस मतविभाजनाची मागणी झाली. त्यामुळे शिरगणतीने मतदान सुरू झाले. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळेसही शिरगणती झाली होती. त्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावताना काही सदस्य गोंधळले होते; पण मुख्यमंत्र्यांवरील विश्वासदर्शक ठरावावर मतदान करण्यासाठी सर्वच सदस्य तयारीत आले होते. त्यामुळे गोंधळ उडाला नाही. पण तरीही मतदानाच्या वेळेस सदस्यांकडून टिप्पणी केली जात होती. ‘झाडी, डोंगार..’मुळे सर्वसामान्यांपासून आमदारांमध्येही लोकप्रिय झालेले शहाजी पाटील मतदानाला उभे राहिले तेव्हा पुन्हा महाविकास आघाडीच्या सदस्यांनी ‘झाडी डोंगार’असा गलका केला तेव्हा शहाजी पाटील यांनी जागेवरूनच कपाळाला हात लावला आणि समोरच्या बाकांवरील सदस्यांना, आता जाऊद्या. किती वेळा बोलणार… अशी खूण केली. बंडखोर आमदार यामिनी जाधव यांनी मतदान करताच महाविकास आघाडीच्या बाकांवरून पुन्हा एकदा ईडीचा गलका झाला तेव्हा यामिनी जाधव यांनी सर्वांना तीन वेळा हात जोडून नमस्कार केला
मतदान करताना प्रत्येक आमदाराला स्वतःचे नाव उच्चारावे लागत होते. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मतदान करताना, आदित्य उद्धव रश्मी ठाकरे असे नाव उच्चारत मातृप्रेमाची प्रचीती दिली. जितेंद्र आव्हाड, आदिती तटकरे, संजय बनसोडे, वर्षा गायकवाड यांनीही वडिलांच्या नावासोबत आईच्या नावाचा उच्चार करीत मातृप्रेम दाखवून दिले.
‘अबतक 56’
काँग्रेसचे कैलाश गोरंटय़ाला हे 56 व्या क्रमांकावर होते. मतदान करताना ‘अबतक 56’ असे उच्चारत, पूर्वी राजकारणात सामदामदंडभेदची निती होती; पण आता राजकारणात ईडी इन्कमटॅक्सची नीती आली आहे, अशी टिप्पणी करताच विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी त्यांना समज दिली त्यावर ‘शेर बोला ते ईडी लग जायेगी’ असे सांगताच हास्याची लकेर उमटली.






























































