माणसे हिंसक होताहेत

>>सुनील कुवरे<<

मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून धुळे जिह्यातील पिंपळनेर गावाजवळ बेभान जमावाने गोसावी समाजातील पाच जणांना ठेचून मारले. ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन त्यांना लाथाबुक्क्यांनी अक्षरशः तुडवण्यात आले. व्हॉट्स अॅपसारख्या माध्यमांचा गैर वापर करण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्स अॅपवर फिरत असलेली अफवा आपली सारासार विवेकबुद्धी नष्ट करणारी ठरत आहे. यापूर्वीदेखील सोशल मीडियावर अफवांमुळे जातीय व धार्मिक वैमनस्य वाढल्याच्या घटना देशभरात घडल्या आहेत. व्हॉट्स अॅपसारख्या प्रकारामुळे अशा घटना घडत असतील तर त्याला पायबंद घालण्याचा विचार झाला पाहिजे. अशा घटना माणुसकीला काळिमा फासणार्‍या आणि संवेदनशील व्यक्तीच्या अंगावर काटा आणणार्‍या आहेत. या घटनांचा एकांगी दृष्टिकोनातून विचार करणे स्वतःच्याच डोळ्यांत धूळफेक करणारी ठरेल. आज समाजातील सर्व घटक एकमेकांकडे संशयाने पाहत आहें. माणसा-माणसातील दरी रुंदावत आहे. परस्परावरील विश्वास का उडत आहे? संशयाने पछाडलेल्या समाजाने आज विकृत आणि क्रूर रूप धारण केले आहे. माणसं हिंसक बनत चालली आहेत. मनावरचे नियंत्रण सुटत आहे, हे कशामुळे होते आहे याचा शोध घ्यावा लागेल. कारण हे फार घातक आहे. या आधी संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारच्या मारहाणीत तीन जणांचा बळी गेला. आतापर्यंत आठ बळी गेले. उत्तर महाराष्ट्रात मुले चोरणारी टोळी कार्यरत असल्याच्या अफवांचे लोण पसरतच आहे. लोकांमध्ये जनजागृती करून या अफवा व घटना रोखण्यात सरकारला अपयश आले आहे. यामुळे पोलिसांची प्रतिमा यातून मलिन तर होतेच आहे; पण पोलिसांच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह आणखी गडद होत चालले आहे. खरे तर केवळ अशा सामूहिक हत्याकांड करणार्‍या झुंडशाहीला पायबंद घालणे एवढेच सरकारचे काम नाही तर भटक्या जमातीच्या लोकांवर भिक्षा मागण्याची वेळ येऊ नये म्हणून परिणामकारक उपाययोजना करणे हे सरकारचे काम आहे. तसेच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी सरकार आणि पोलीस घेतील काय?