
मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही आता ‘डबल डेकर’ बस धावण्याचा मार्ग मोकळा झाला असून गुरुवारी झालेल्या पीएमपीएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. यानूसार पहिल्या टप्प्यात २० इलेक्ट्रीक डबल डेकर बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून यावर चर्चा सुरू होती.
गुरुवारी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) कार्यालयात संचालक मंडळाची बैठक पार पडली. बैठकीला पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह हे ऑनलाईन उपस्थित होते. तर, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष ओमप्रकाश बकोरीया, सह व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा पवार – पोतदार यांच्यासह पीएमपीएलचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. बैठकीत डबल डेकर बसखरेदी, विनातिकीट प्रवास करणार्यांना आकारण्यात येणारा दंड, ई – कॅब खरेदी आदींबाबत चर्चा झाली.
पुणे आणि पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामिण भागात प्रवासी वाहतूक सेवा देणार्या पीएमपीएलच्या ताफ्यात २ हजारहून अधिक बसेस आहेत. यात भाडेतत्वावरील आणि पीएमपीएलच्या स्वमालकीच्या बसेसचा समावेश आहे. शहराची वाढती लोकसंख्या पाहता या बसची संख्या वाढविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. यातच पर्यावरणपुरक वाहतूकीसाठी मागील काही वर्षांपासून पीएमपीएल ताफ्यात इलेक्ट्रीक बसेसची संख्या वाढविण्यात आली आहे. याच अनुषंगाने आता पीएमपीएलच्या ताफ्यात मुंबईच्या धर्तीवर ‘डबल डेकर’ बसचा समावेश होणार आहे. मागील काही दिवसांपासून याची चर्चा सुरू होती. याबाबत पीएमपीएल प्रशासनाने डबल डेकर बस धावणार्या मुंबईतील बेस्ट सोबत चर्चा करून माहिती देखील घेतली होती. या सर्व चर्चेअंती प्रशासनाने डबल डेकर बसखरेदीचा निर्णय घेतला असून पहील्या टप्प्यात २० इलेक्ट्रीक बसेस खरेदीला मंजूरी देण्यात आली. यानंतर हा प्रयोग यशस्वी झाल्यास टप्प्याटप्याने या बसेस वाढविण्यात येतील. पहिल्या टप्प्यात खरेदी केल्या जाणार्या डबल डेकर बस या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्थिक सहाय्यातून खरेदी केल्या जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
ई – कॅबचा निर्णय रद्द
शहरात बससेवा पुरविणार्या पीएमपीएलकडून ईलेक्ट्रीक कॅब खरेदी करून त्यामाध्यमातून प्रवासी वाहतूक सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रशानसाने आता हा निर्णय रद्द केला आहे. पीएमपीएलने हा निर्णय घेतल्यानंतर चांगलीच चर्चा झाली होती. अखेर हा निर्णय प्रशासनाने रद्द केला.
फुकट्या प्रवाशांच्या दंडात वाढ
पीएमपीएलने प्रवास करताना विनातिकीट प्रवास करणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा प्रवाशांमुळे प्रशासनाचा महसूल बुडतो. अशाप्रकारे विनातिकीट प्रवास करणार्यांना प्रशासनाकडून आजवर तीनशे रुपये दंड आकारण्यात येत होता. यात वाढ करण्यात आली असून तो दंड पाचशे रुपये करण्यात आला आहे.































































