अकरावीचे लेक्चर्स शिक्षकांअभावी बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
teacher-1
प्रातिनिधिक

कोरोना काळात अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेले ऑनलाइन वर्ग शिक्षकांअभावी बंद पडले आहेत. या वर्गात मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक उत्सुक नसल्याचे समोर आले आहे.

कोरोनामुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया लटकली होती. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अकरावीच्या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी यूटय़ूबच्या माध्यमातून मोफत ऑनलाइन वर्ग सुरू केले. यासाठी राज्यातील 80 शिक्षकांची टीम तयार करण्यात आली. या लेक्चर्सना उपस्थित राहण्यासाठी https://covid19.scertmaha.ac.in/eleventh या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक होते. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गाची लिंक देण्यात येत होती. मात्र 15 जानेवारीनंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन न मिळाल्याचे समोर आले आहे. काही शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील अकरावी, बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे या वर्गांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आपापल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेण्यास गुंतले आहेत.

टीईटीतील दुरुस्तीबाबत महाधिवक्ता यांचे मत घेणार

शिक्षक पात्रता परीक्षेबाबत (टीईटी) कायद्यात राज्याची दुरुस्ती करण्याबाबत महाधिवक्ता यांचे मत विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना न्याय देण्याबाबत सदस्य नागोराव गाणार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या विधान परिषदेत बोलत होत्या.

पदोन्नती, वेतननिश्चितीबाबत कार्यवाही होणार

राज्यातील सहयोगी प्राध्यापक पदोन्नती व वेतननिश्चिती पडताळणीबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या त्रुटी निवारण समितीकडून मार्गदर्शन मागवण्यात आले असून ते प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतची योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. यासंदर्भात सदस्य अरुण लाड यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यात सुमारे 500 प्राचार्यांची पदे भरावयाची होती. त्यापैकी 260 प्राचार्यांची भरती करण्यात आलेली आहे.