एल्गार परिषद प्रकरण- 11 आरोपींचे तळोजा तुरुंगात उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणातील 11 आरोपींनी मंगळवारी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात लाक्षणिक उपोषण केले. या प्रकरणातील 83 वर्षीय आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचा गेल्या वर्षी 5 जुलैला मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एल्गार परिषद प्रकरणातील इतर आरोपींनी तुरुंग प्रशासनाविरोधात उपोषण केले. फादर स्वामी यांचा मृत्यू हा तळोजा तुरुंग प्रशासन, एनआयए आणि सरकारने केलेली निर्घृण हत्या असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. यासंदर्भात सहआरोपी सुधीर ढवळे यांनी तळोजा कारागृह अधीक्षक आणि वकिलांना पत्र लिहिले असून तळोजा तुरुंगातील वैद्यकीय सुविधांचा अभाव व इतर गैरसोयींकडे लक्ष वेधले आहे. स्वामी यांच्या मृत्यूनंतरही परिस्थिती जैसे थे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.