
मुंबई महानगर क्षेत्राला (एमएमआर) विजेच्याबाबतीत आत्मनिर्भर बनवणार असल्याची घोषणा आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. त्यानुसार विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरातील वीज निर्मिती क्षमता वाढवणे, बाहेरून वाहून आणाव्या लागणाऱ्य़ा विजेवरील अवलंबित्व कमी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईचा वीज पुरवठा 12 ऑक्टोबरला ठप्प झाल्यावर याप्रश्नी मी लक्ष घातले असून मुंबई आणि एमएमआरला वीज निर्मितीबाबत आत्मनिर्भर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही! या मोहिमेअंतर्गत मी आज अडाणी समूहाच्या वीज निर्मिती, पारेषण व स्काडा यंत्रणेचा आढावा घेतला. @INCMaharashtra @Adani_Elec_Mum pic.twitter.com/I0pTDkMvD2
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) November 3, 2020
मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या 12 ऑक्टोबर रोजी खंडित झालेल्या वीज पुरवठय़ाच्या पार्श्वभूमीवर उर्जामंत्र्यांनी आज अदानी इलेक्ट्रिसिटीच्या गोरेगाव येथील इलेक्ट्रिसिटी मॅनेजमेंट सेंटरला भेट देऊन आढावा घेतला.
मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात आज चार कोटी 62 लाख नागरिक वास्तव्यास असून एक कोटी दोन लाख वीज जोडण्या आहेत. एवढया मोठय़ा संख्येने असलेल्या ग्राहकांची विजेची मागणी मोठी आहे. ती पूर्ण करण्याबरोबरच मुंबईला विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवण्यासाठी काय करावे लागेल यासाठी वीजनिर्मिती, वीज वितरण कंपन्यांना भेट देऊन आढावा घेत असल्याचे उर्जामंत्र्यांनी सांगितले. यावेळी ऊर्जा सचिव असिमपुमार गुप्ता, महापारेषणचे एमडी दिनेश वाघमारे, अदानी इलेक्ट्रिसिटीचे सीईओ कंदर्प पटेल आदी उपस्थित होते.



























































