साखरपुड्याच्या कार्यक्रमात जेवणावरून झाला वाद, तिघांवर कोयत्याने वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साखरपुड्याच्या कार्यक्रमात जेवणावरून झालेल्या वादानंतर एका महिलेसह तिघांवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शिवाजीनगरमधील पाटील इस्टेट परिसरात घडली आहे. याप्रकरणी नऊ जणांविरोधात खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली.

वाहिदा शेख, शाहरुख नबु शेख, शौकत नबु शेख, मोहसीन निसार खान, निसार जंगु खान, यासीन खान, शबाना खान, अशिफ शेरू शेख आणि रुकसाना शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. शौकत नबु शेख आणि निसार जंबू खान यांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी गौरी सईद शेख (वय 22, रा. महात्मा गांधी वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी आणि फिर्यादी हे शेजारी राहण्यास आहेत. 20 फेब्रुवारीला आरोपी रुकसाना शेख यांच्या मुलीचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्यावेळी गौरी शेख यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य कार्यक्रमाला गेले होते. साखरपुडा झाल्यानंतर गौरी जेवण करण्यासाठी गेल्या असता, जेवण संपत आले होते. त्यावेळी मुलीचा नातेवाईक जेवणावरून सईद शेख यांना शिवीगाळ करीत होता.

त्यावेळी गौरीने त्यांना समजावून सांगितले. त्याचा राग आल्यामुळे आरोपींनी फिर्यादी गौरीसह मजिद खान आणि शौकत खान यांना मारहाण करून कोयत्याने वार केला. पाटील इस्टेट मे हम ही भाई है असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण तपास करीत आहेत.