
इच्छा असेल तिथे मार्ग निघतोच, हे वरळीतील अक्षय जंगम या तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे. अनेक आव्हानांना तोंड देत एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करत प्रजासत्ताकदिनी अक्षयने तिथे तिरंगा आणि छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा फडकवला आहे. विशेष म्हणजे अवघ्या सात दिवसांत त्याने हे शिखर सर केले असून या काळात त्याने केवळ द्रवपदार्थांचे सेवन केले होते. अनोख्या कामगिरीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अक्षय हा एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. लहानपणापासून त्याला गिर्यारोहणाची आवड. 360 एक्सप्लोररमार्फत एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली 19 जानेवारीला त्याने या मोहिमेला सुरुवात केली. उणे 35 अंश सेल्सियस तापमान असतानाही तो मागे हटला नाही. 26 जानेवारीला सकाळी 10 वाजता त्याने एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठले. एव्हरेस्ट बेस कॅम्पची उंची 5364 मीटर म्हणजेच जवळपास 18 हजार फूट आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्यासाठी गिर्यारोहकांना साधारण 13 ते 14 दिवस लागतात. अक्षयने ही मोहीम सात दिवसांत फत्ते केली.
मोहिमेत सात दिवस फक्त द्रवपदार्थ प्यायचे. कोणतेही अन्न खाल्ले नाही, असा विक्रम केला आहे. माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. या मोहिमेत अनेक आव्हाने असले तरी माझ्यासोबत महाराजांची प्रेरणा होती. माझे हे यश महाराजांना मी समर्पित करतो. – अक्षय जंगम, गिर्यारोहक
























































