भ्रष्टाचार उघड करूनच कश्मीरमधून जाईन! राज्यपाल आणि माजी मुख्यमंत्र्यांत जुंपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद आणि सुरक्षेच्या मुद्दय़ावरून राज्यपाल सत्यपाल मलिक आणि कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांच्यात चांगलीच जुंपली आहे. ओमर अब्दुला हे राजकारणातील बच्चा आहेत. प्रत्येक मुद्दय़ावर ते ट्विट करत सुटतात. त्यांनी केलेला भ्रष्टाचार उघड करूनच कश्मीरमधून जाईन, असे आव्हान सत्यपाल मलिक यांनी दिले.

दहशतवाद्यांनी सुरक्षा दलातील जवान आणि निष्पाप लोकांच्या हत्या करणे बंद करून त्याऐवजी भ्रष्टाचार करून कश्मीरची लूट करणार्‍यांची हत्या करावी असे विधान राज्यपाल मलिक यांनी केले होते. त्यावर  नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी  यापुढे जम्मू-कश्मीरमध्ये कोणत्या नेत्याची किंवा नोकरशहाची हत्या झाली तर ती राज्यपालांच्या आदेशानुसार झाली असेच समजले जाईल, असे ट्विट करत संताप व्यक्त केला.

अब्दुला यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेला राज्यपाल सत्यपाल सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तुमच्यासारखा माझ्याकडे पैसा नाही. वडील-आजोबांचे नाव नाही. दीड खोल्यांच्या घरातून इथवर आलोय. दिल्लीत माझी प्रतिष्ठा असल्याने मी इथे आहे आणि तुम्ही तुमच्या प्रतिष्ठेमुळे जिथे असायला पाहिजे तिथेच आहात अशी खोचक टीका मलिक यांनी केली.

ओमर राजकारणातील बच्चा

ओमर हे राजकारणातील बच्चा आहेत, नवशिकाऊ आहेत. कोणत्याही मुद्दय़ावर ते ट्विट करतात. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया वाचल्या तर लक्षात येईल की 90 टक्के लोक त्यास विरोध करतात. हवे तर गल्लीगल्लीत जाऊन त्यांच्याबद्दल विचारल्यास जनता त्यांच्या विरोधातच मत व्यक्त करताना दिसेल असे त्यांनी म्हटले आहे.