
ज्येष्ठ नेते व साहित्यिक, माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वैयक्तिक 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. या रकमेचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यावर जमा केला आहे.
‘कोरोनामुळे सगळे उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. करोडो हातांची रोजीरोटी हिरावली गेली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मोठ्या संख्येने लोक स्वत:चे गाव सोडून इतर भागात अडकून पडले आहेत. त्यांच्या पोटापाण्याची व खुशालीची मोठी समस्या उभी राहिली आहे. अशा सर्व गरजूंना हातभार म्हणून या निधीचा वापर व्हावा’ अशी अपेक्षा गडाख यांनी व्यक्त केली आहे. तसेच गरज लागेल तेव्हा आपल्या सर्वांनाच अजूनही त्या निधीत भर टाकावी लागणार आहे असेही ते म्हणाले.
संपूर्ण देशाला चिंतेत टाकणाऱ्या कोरोना या व्हायरसच्या आजाराशी लढण्यासाठी सरकारला मोठ्या निधीची गरज लागणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्री निधीसाठी यथाशक्ती मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले होते.


























































