
आर्थर रोड तुरुंगातील जेलर व वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी दिल्याच्या प्रकरणात माजी आमदार रमेश कदम यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील मूळ तक्रारदार तत्कालीन तुरुंग वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी गुरुवारी जबाब फिरवला. रमेश कदम यांनी मला शिवीगाळ वा धमकी दिली नव्हती, असे डॉ. घुले यांनी सांगितले. त्याआधारे सत्र न्यायालयाने त्यांना फितूर घोषित केले.
अण्णाभाऊ साठे महामंडळ गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असताना रमेश कदम यांनी 24 फेब्रुवारी 2016 रोजी आर्थर रोड तुरुंगातील जेलर व वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करीत धमकी दिल्याचा आरोप आहे. जे. जे. रुग्णालयात नेण्यासाठी गाडी उपलब्ध केली नाही, याचा राग मनात धरून कदम यांनी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गुरुवारी विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी रमेश कदम यांच्यातर्फे अॅड. प्रकाश सालसिंगीकर यांनी बाजू मांडली. याचदरम्यान तक्रारदार डॉ. राहुल घुले यांचा जबाब नोंदवण्यात आला.
मला रमेश कदम यांनी शिवीगाळ वा धमकी दिली नव्हती. एफआयआरवरील सही माझी आहे. मात्र सरकारी कर्मचारी म्हणून मी तत्कालीन तुरुंग अधिक्षक भारत भोसले यांच्या सुचनेचे पालन केले. त्यांच्याच सूचनेवरून ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, असा जबाब डॉ. घुले यांनी दिला. त्याआधारे न्यायालयाने त्यांना फितूर घोषित केले.
न्यायालय आता तत्कालीन जेलर भारत भोसले व सहवैद्यकिय अधिकारी योगेश कोकडवार यांना साक्षीदार म्हणून बोलवणार आहे. तक्रारदारच फितूर घोषित झाल्याने रमेश कदम यांच्या निर्दोष सुटकेचा मार्ग आणखी सुकर बनल्याचे मानले जात आहे.






























































